बळीराजा चेतना अभियानाची पोलखोल!

By Admin | Updated: April 9, 2017 23:37 IST2017-04-09T23:36:38+5:302017-04-09T23:37:47+5:30

उस्मानाबाद : शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात, यासाठी राज्यशासनाकडून बळीराजा चेतना अभियान सुरू करण्यात आले.

Baliraj Chetna campaign pollution! | बळीराजा चेतना अभियानाची पोलखोल!

बळीराजा चेतना अभियानाची पोलखोल!

उस्मानाबाद : शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात, यासाठी राज्यशासनाकडून बळीराजा चेतना अभियान सुरू करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी अभियानाचा आढावा घेतला. यावेळी अनेक गंभीर बाबी समोर आल्या. प्रत्येक गावाला दिलेले पैैशांचे कसे वाटप केले? निकष काय लावले? पैैसे कोणाकडे दिले? अभियानाची जबाबदारी कोणी सांभाळली? गावस्तरावरील समितीमध्ये गुरूजीची नियुक्ती का केली नाही? आरोग्य कॅॅम्पसाठी जनरिक औषधी का खरेदी केल्या नाहीत? वितरित केलेल्या पैैशाचा विनियोग झाला की नाही, अशा एक ना अनेक प्रश्नांची रावते यांनी सरबत्ती केली. त्यामुळे अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. तर काहीजण चक्क निरूत्तर झाले. या प्रकारामुळे संतप्त होत रावते यांनी ‘प्रशासन बळीराजा चेतना अभियान समर्थपणे राबवू शकले नाही’, अशा शब्दात ठपका ठेवत अभियानाच्या अंमलबवणीची अक्षरश: पोलखोल केली.
दुष्काळी परिस्थिती आणि नापिकीला कंटाळून २०१५ मध्ये जिल्ह्यातील तब्बल १६४ शेतकऱ्यांनी मृत्युला जवळ केले. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी बळीराजा चेतना अभियान हाती घेण्यात आले. या अभियानाचा आढावा घेण्यासाठी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठक सुरू होताच अधिकाऱ्यांनी अभियानाच्या अंमबजावणीबाबत माहिती देण्यास सुरूवात केली असता, शेतकऱ्यांमध्ये आलेले नैैराश्य घालविण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांनी कोणावर टाकली होती? असा सवाल केला असता ना प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांकडे याचे उत्तर होते ना अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे. संबंधित अधिकाऱ्यांना उत्तर देता येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर सीईओ रायते यांनी जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सकांवर सोपविली होती, असे सांगितले. त्यावर रावते यांनी त्यांची जबाबदारी नैैराश्य घालविण्याची नसून आरोग्य तपासणी करण्याची आहे, असे सांगत ‘नैैराश्य शोधल्याशिवाय सापडत नाही’, अशा शब्दात अधिकाऱ्यांना टोलाही लगाविला.
अभियानाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हास्तरावरून आखणी होणे अपेक्षित होते. पंरतु, तसे झाल्याचे कुठेही दिसत नाही. प्रशासनाने गावोगावी जावून नैैराश्यग्रस्त शेतकऱ्यांचा शोध घेवून त्यांना आवश्यक ते सहाय्य करणे अपेक्षित होते. परंतु, तेही प्रयत्न झाल्याचे पहावयास मिळत नाही. अभियानाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर एखाद्या जिम्मेदार अधिकाऱ्याकडे ही जबाबदारी सोपविणे गरजेचे होते. परंतु, तेही कुठे झालेले पहावयास मिळत नसल्याचे ते म्हणाले. या अभियानात कृषी तसेच पशुसंवर्धन विभागाचीही महत्वाची जबाबदारी होती, असे सांगत जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी खोत यांना ‘आपण काय प्रयत्न केले’? असा सवाल केला. अनेक शेतकरी असे आहेत, ज्यांना पैैशाअभावी पेरणी, अथवा नांगरणी करता येत नाही. अशा शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोंचलात का? असा सवाल केला. परंतु, खोत यांच्याकडे रावते यांच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते. या प्रकारबाबात रावते यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. अभियान राबवूनही शेतकरी आत्महत्या रोखता आलेल्या नाहीत. २०१५ च्या तुलनेत शेतकरी आत्महत्यांच्या केवळ दोन-तीन घटना कमी झाल्या. प्रशासनाने हे अभियान समर्थपणे राबविले असते तर हे चित्र वेगळे दिले असते, असे ते म्हणाले. बैठकीला आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. सुजितसिंह ठाकूर, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी अविनाश पाठक, सीईओ आनंद रायते, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील यादव, उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदींची उपस्थिती होती.
माले यांची खरडपट्टी
जिल्हा शल्यचिकित्सक माले यांनाही रावते यांनी चांगलेच खडसावले. अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आरोग्यसेवा पुरविण्यासाठी सुमारे ३२ लाख देण्यात आले होते. यातून काय केले? असा सवाल केला. त्यावर माले यांनी सतरा ते साडेसतरा लाख रूपये औषधांवर खर्च केला. उर्वरित पैैसे शिबिरे व अन्य उपाययोजनांवर खर्च केले, असे उत्तर दिले. त्यावर रावते यांनी साडेसतरा लाखातून जनेरिक औषधे का खरेदी केली नाहीत? असा सवाल करीत एवढ्या रकमेतून २५ पट अधिक औषधी आली असती. तसेच तालुक्याच्या ठिकाणी शिबिरे घेण्यापेक्षा वाहनातून डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी गावात गेले असते तर शेतकऱ्यांना मोठा धीर मिळाला असता.
उत्कृष्ट कर्मचारी निवडही नाही
बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकाऱ्याची वा कर्मचाऱ्याची निवड करणे अपेक्षित आहे. तशा सूचनाही आहेत. याच अनुषंगाने रावते यांनी ‘आपल्या जिल्ह्यात उत्कृष्ट अधिकारी किती आहेत’? असा सवाल केला. परंतु, अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना एकाही अधिकाऱ्याचे नाव सांगता आले नाही. कारण अभियानाचा कालावधी संपून गेला तरी त्याची निवड करण्यात आलेली नाही. यावरूनही रावते यांनी नाराजी व्यक्त केली.
गुरूजीलाच वगळले
गावपातळीवर अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीतील सदस्यांची नावे वाचून दाखविल्यानंतर रावते यांनी या समितीमध्ये गुरूजींना का घेतले नाही? असा सवाल केला. विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांच्याही ते संपर्कात असतात. त्यांच्या कुटुंबियांच्या अडीअडचणी त्यांना बऱ्यापैैकी कल्पना असते. असे असतानाही गुरूजीलाच कमिटीत घेतले नसल्याचे सांगत त्यांनी समित्यांच्या गठणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले.(प्रतिनिधी)

Web Title: Baliraj Chetna campaign pollution!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.