ऐक्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व मान्य!
By Admin | Updated: April 20, 2016 23:24 IST2016-04-20T23:10:51+5:302016-04-20T23:24:19+5:30
जालना : गटा तटात विखुरलेल्या रिपब्लिकन जनतेला एकत्र आणण्यासाठी ज्याप्रमाणे नेत्यांची जबाबदारी आहे, त्याच प्रमाणे समाजबाधवांवरही एक जबाबदारी आहे.

ऐक्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व मान्य!
जालना : गटा तटात विखुरलेल्या रिपब्लिकन जनतेला एकत्र आणण्यासाठी ज्याप्रमाणे नेत्यांची जबाबदारी आहे, त्याच प्रमाणे समाजबाधवांवरही एक जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व मान्य करण्यास तयार असल्याची घोषणा रिपाइंचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी बुधवारी केली.
भारत भीम यात्रेनिमित्त जालन्यात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी रिपाइंचे मराठवाडा अध्यक्ष अॅड. ब्रम्हानंद चव्हाण, बाबुराव कदम, मिलिंद शेळके, पप्पू कागदे, सुधाकर रत्नपारखे, गणेश रत्नपारखे, एन. डी. गायकवाड, दिंगबर गायकवाड, संगीता अंभोरे, सतिश वाहुळे आदींची उपस्थिती होती.
यावेळी ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समता निर्माण करण्याचे, सर्वांना रोजी, रोटी आणि कपडा देण्याचे घटनात्मक अधिकारांच्या माध्यमातून न्याय देण्याचे, जाती व्यवस्था नष्ट करण्याचे स्वप्न होते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी रिपाइंच्यावतीने २६ जानेवारी रोजी कन्याकुमारीपासून जाती- तोडो, समाज जोडोचा संकल्प हाती घेवून भारत भीम यात्रा सुरू करण्यात आली आहे.
जातीमुळे तुटत चाललेला समाज एकत्र आणण्याचा तो एक प्रयत्न आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून ते म्हणाले की, आज रिपाइंचे अनेक गट असले तरी एकच रिपाइं देशभर लोकांसमोर आहे. विखुरेलेले हे गट एकत्र यावेत ही सर्वांची इच्छा आहे. या ऐक्यासाठी आपण चार पावले मागे घेण्यास तयार ुआहोत. ऐक्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व आपल्याला मान्य आहे.
हे ऐक्य टिकविण्यासाठी सर्वात मोठी जबाबदारी ही समाजबांधवाची राहणार आहे. ऐक्यातील एखादा नेता फुटून जर बाहेर पडला तर त्याचे मागे न जाता. त्यालाच आपल्या गावात, जिल्ह्यात बंदी घालून फिरू देवू नये. तसेच इतर जातीचे मत कसे मिळेल यासाठीचा प्रयत्नही करावे लागेल. हेच एक हे मोठे आव्हान राहणार असल्याचे ते म्हणाले. भारत भीम यात्रेचा समारोप १ मे रोजी महू येथे होणार असून, यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधानात बदल करू पाहत आहेत. असा कॉग्रेसचा मोदी विरोधात खोटा प्रचार सुरू असल्याचे खा. आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, संविधान कुणालाही बदलता येत नाही. त्यातील काही कायद्यांच्या तरतुदीत असलेली कलमे बदलून नव्यान कायदा करता येऊ शकतो. मात्र संविधानात बदल करता येत नाही. ज्या दिवशी संविधान बदलासाठी त्याला हात लावला जाईल, तो दिवस सरकारचा शेवटचा दिवस असेल. कोणालाही संविधान बदलू देणार नाही.
४काँग्रेसकडून मोदी संविधानात बदल करत असल्याचा खोटा प्रचार सुरू आहे. काँग्रसेला अद्याप विरोधीपक्षाची भूमिकाच निभावता आलेली नाही. भाजपा आघाडीचे सरकार हे सक्षम असून, ते ५ वर्ष टिकेल. तेव्हा काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी आपली विरोधकांची नैतिक जबाबदारी स्विकारली पाहिजे. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले की, स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे. मात्र स्वतंत्र मराठवाडा नको. डॉ. आंबेडकरांनी नदीजोडप्रकल्पाची संकल्पना त्याकाळी मांडली होती. मात्र, अद्याप त्यावर अंमल झालेला नाही. भाजपा सरकार हा प्रकल्प राबवेल अशी आशा आठवले यांनी व्यक्त केली.
भारत भीम यात्रेतून जाती तोडा समाज जोडाचा संदेश दिला जात आहे. यासाठी सरकारने अंतरजातीय विवाहाला प्रात्साहन दिले पाहिजे. अंतरजातीय विवाह करणाऱ्यापैकी एकाला सरकारी नोकरी आणि ५ लाखांची आर्थिक मदत द्यावी. मध्यप्रदेशातील महू या डॉ. बाबासाहेबांच्या जन्म गावी स्मारकाची व्याप्ती वाढविण्यासाठी जागा द्यावी, कन्याकुमारी येथील समुद्राच्या त्रिवेणी संगमात स्वामी विवेकानंदांप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारावा या मागण्या भारत भिम यात्रेतून करण्यात येत असल्याचे खा. आठवले यांनी सांगितले.