२० लाखांचा शिलकी अर्थसंकल्प मंजूर
By Admin | Updated: March 19, 2016 20:23 IST2016-03-19T20:08:00+5:302016-03-19T20:23:34+5:30
परभणी : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा वित्ती समितीचे सभापती राजेंद्र लहाने यांनी शुक्रवारी आगामी २०१६-१७ या वर्षासाठीचा २० लाख ६४ हजार ३६७ रुपयांचा शिलकीचा अंदाजपत्रक सादर केला.

२० लाखांचा शिलकी अर्थसंकल्प मंजूर
परभणी : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा वित्ती समितीचे सभापती राजेंद्र लहाने यांनी शुक्रवारी आगामी २०१६-१७ या वर्षासाठीचा २० लाख ६४ हजार ३६७ रुपयांचा शिलकीचा अंदाजपत्रक सादर केला. हे अंदाजपत्रक सादर करीत असताना जिल्हा परिषदेच्या प्राप्त उत्पन्नातून ५३ टक्के म्हणजे १ कोटी ८७ लाख ६१ हजार १६४ रुपयांची तरतूद समाजकल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा, महिला बालकल्याण आणि अपंग कल्याणच्या खर्चासाठी राखून ठेवण्याचे जाहीर करण्यात आले.
येथील जिल्हा परिषदेच्या कै.बाबूराव पाटील गोरेगावकर सभागृहात १८ मार्च रोजी दुपारी २ वाजता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. यावेळी जि.प.उपाध्यक्ष राजेंद्र लहाने, मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुंबरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कपाळे, सभापती दादासाहेब टेंगसे, अनिता जैस्वाल, अर्चना कऱ्हाळे, लक्ष्मीबाई पुंजारे, बी.टी.कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, एम.व्ही.करडखेलकर, मुख्य लेखा व वित्तअधिकारी किरणकुमार धोत्रे आदींची उपस्थिती होती.
वित्त समितीचे सभापती तथा जि.प.उपाध्यक्ष राजेंद्र लहाने यांनी २०१५-१६ चे जिल्हा परिषदेचे सुधारित अंदाजपत्रक आणि २०१६-१७ च्या मूळ अंदाजपत्रकाचे वाचन केले. जिल्हा परिषदेला मागील वर्षीच्या शिलकेसह २०१६-१७ या वर्षात २१ कोटी ५२ लाख ३ हजार ३६७ रुपयांचे महसुली उत्पन्न मिळणार आहे. सदर उत्पन्नातून सर्व घटकांना समाविष्ट करुन आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यातून समाजकल्याण विभागासाठी २० टक्के, ग्रामीण पाणीपुरवठा विभागासाठी २० टक्के, महिला व बालकल्याण विभागासाठी १० आणि अपंग कल्याण विभागासाठी ३ टक्के अशी ५३ टक्क्यांची तरतूद राखीव ठेवण्यात आली आहे. त्यानुसार समाजकल्याण व अपंग कल्याणसाठी ८० लाख, ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी ७५ लाख, महिला व बालकल्याण विभागासाठी ५० लाख रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला. तसेच प्रशासन विभागासाठी ८१ लाख ४ हजार रुपये, शिक्षण विभागासाठी १ कोटी २० लाख, इमारत व दळणवळणासाठी ७ कोटी २५ लाख, लघुसिंचन विभागासाठी १ कोटी ६७ लाख, सार्वजनिक आरोग्यासाठी १ कोटी ५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून सर्वाधिक तरतूद करण्यात आली असून संकीर्ण विभागासाठी ४ कोटी १९ लाख ४४ हजार तर कृषी विभागासाठी १ कोटी २१ लाख ५२ हजार रुपयांची तरतूद प्रस्तावित केली आहे.
२०१६-१७ या वर्षात जिल्हा परिषदेला ४० कोटी ५७ लाख ४ हजार ३६७ रुपयांचे अपेक्षित उत्पन्न आहे. त्यातून महसुली व भांडवली खर्च ४० कोटी ३६ लाख ४० हजार रुपयांचा करण्यात आला आहे. एकूण उत्पन्नाच्या तुलनेत होणाऱ्या खर्चातून २० लाख ६४ हजार ३६७ रुपये शिल्लक ठेवण्यात आली असून या अंदाजपत्रकास सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.