बजाजनगरवासिय दूषित पाण्याने त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 23:26 IST2019-03-15T23:26:46+5:302019-03-15T23:26:53+5:30
बजाजनगरात नागरिकांना काही दिवसांपासून पिवळसर व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे साथीचे आजार जडत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

बजाजनगरवासिय दूषित पाण्याने त्रस्त
वाळूज महानगर : बजाजनगरात नागरिकांना काही दिवसांपासून पिवळसर व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे साथीचे आजार जडत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याच बरोबर टवाळखोरांच्या उपद्रवामुळे महिलांना रस्त्याने चालणेही अवघड झाले आहे.
बजाजनगर निवासी क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. गळतीचे साचलेले घाण पाणी पुन्हा जलवाहिनीच्या पाण्यात मिसळत आहे. त्यामुळे बजाजनगरातील घृष्णेश्वर हौ. सोसायटी, देवगिरी हौ, सोसायटी, स्रेह संवर्धन हौ, सोसायटी, गाडगेबाबा हौ, सोसायटी, तुळजाभवानी हौ. सोसायटी आदी भागांतील रहिवाशांना पिवळसर रंगाचे दुर्गंधीयुक्त दूषित पाणी पुरवठा होत आहे. यामुळे मलेरिया, कावीळ, पोटदुखी, जुलाब आदी साथीच्या आजाराची लागण होत असून, लहान मुले सारखे आजारी पडत आहेत. वारंवार तक्रारी करुनही प्रशासन शुद्ध पाणीपुरवठा करत नाही. दूषित पाण्यामुळे पिण्यासाठी विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
या भागात एमआयडीसीने पथदिवे बसविले आहेत. पण अद्यापही सुरु केलेले नाहीत. काही ठिकाणी लावलेले दिवे चुकीच्या पद्धतीने बसविल्याने त्याचा नागरिकांना उपयोग होत नाही. त्यामुळे या सोसायटीतील रहिवाशांना कायम अंधरातून ये-जा करावी लागत आहे. स्थानिक पोलिसांचा धाक नसल्याने टवाळखोरांचा उप्रदव वाढला आहे. या टवाळखोरामुळे महिला व तरुणींना रस्त्याने वावरणे अवघड झाले आहे. एमआयडीसी सक्तीने सेवा कराची वसुली करुनही सेवा देत नाही. लोकप्रतिनिधीही समस्या सोडवित नाही. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, असे येथील मीनाक्षी काजळे, दुर्गा निंबोळकर, मंदा गाडेकर, अरुणा भवर, दीपीका जावळकर, पुष्पा पुजारी, सविता तुपे, लीला पाथ्रीकर, लता काळे, सुरेखा पुजारी आदींनी सांगितले.
दूषित पाण्या संदर्भात अजूनही तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यास शहानिशा करुन शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाईल.
- एस.के. गव्हाणे, सहाय्यक अभियंता ,एमआयडीसी.