छत्रपती संभाजीनगर : टोलनाक्याच्या कामात गुंतवणुकीचे आमिष दाखवून ठाण्याच्या व्यावसायिकासह तिघांची एकाने २ कोटी ३० लाखांची फसवणूक केली. विजय केशव धायडे (रा. ब्ल्यू बेल सोसायटी, चिकलठाणा औद्योगिक वसाहत) असे आरोपीचे नाव असून त्याचे वडील निवृत्त न्यायाधीश आहेत.
ठाण्याच्या भायंदर येथील बार व्यावसायिक मंगेश म्हात्रे यांचे शहरातील मित्र विशाल घुगे यांच्यामार्फत डिसेंबर, २०२१ मध्ये विजय व त्याची पत्नी प्रियंका धायडे यांच्यासोबत ओळख झाली होती तेव्हा विजयने तो स्वत: घई इंजिनियर्स ॲण्ड कन्स्ट्रक्शन फर्ममध्ये भागीदार आहे शिवाय त्याची स्वत:ची गणेश लेबर सप्लायर्स ॲण्ड सर्व्हिसेस नावाने फर्म असून त्याच्याकडे पैसे गुंतवल्यास २ ते ८ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. ही गुंतवणूक टोलनाक्याचे टेंडर, रियल इस्टेटमध्ये गुंतवल्यास नफा मिळत असल्याचे सांगत शहरातील अनेकांसोबत करार दाखविले. विश्वास ठेवत म्हात्रे यांनी त्याला जानेवारी २०२२ मध्ये २० लाख रुपये दिले. मार्च, २०२२ मध्ये त्याने म्हात्रे यांना तीन महिन्यांचे १ लाख २० हजार रुपये रोख परतावा देत विश्वास जिंकला. काही दिवसांनी धायडेने त्यांना फोन करून समृद्धी महामार्ग व बांद्रा कुर्ला सी-लिंकवरील टोलनाक्याचे टेंडर भरण्यासाठी ५ लाखांची तातडीने गरज असल्याचे पैसे मागितले. त्यावर म्हात्रे यांनी त्याला ५ लाख रुपये पाठविले.
अनेक कारणे दिले २८ मे, २०२२ रोजी धायडेने म्हात्रे यांना नाशिकच्या मुंबई टोलनाक्याजवळ बोलावून घेतले. टोलनाक्याच्या कामाचे कारण करत पुन्हा २५ लाख रुपये त्यांच्याकडून उकळले. ३० मे २०२२ रोजी पुन्हा १२ लाख रुपये दिले. तोपर्यंत एकूण ७५ लाख रुपये गुंतवल्याचा करारनामा धायडेने त्यांच्यासोबत केला. या दरम्यान त्याने अनेकदा त्यांना परतावा दिला. सप्टेंबर २०२२ पर्यंत विविध कारणे करत धायडेने म्हात्रे यांच्याकडून १ कोटी रुपये उकळले.
तक्रारदार वाढण्याची शक्यताअनेक महिने उलटूनही परतावा मिळत नसल्याने म्हात्रे यांनी २०२३ मध्ये त्याचे घर गाठले तेव्हा धायडेने माझे एमएसआरडीसीचे १३ कोटींचे बिल येणे बाकी आहे, ते आल्यावर पैसे देईल. असे सांगितले. वारंवार कॉल, भेटण्याचा प्रयत्न केल्यास विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. म्हात्रे यांच्याप्रमाणेच विशाल घुगे यांच्याकडून ३० लाख, रश्मी वाडे यांच्याकडून ५० लाख, कीर्ती घुगे यांच्याकडून ५० लाख उकळले. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तक्रारदार वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार तपास करत आहेत.