परतूर रेल्वे स्थानक असुरक्षित
By Admin | Updated: June 20, 2014 00:47 IST2014-06-19T23:44:17+5:302014-06-20T00:47:41+5:30
परतूर : परतूर रेल्वे स्थानकावर देवगिरी एक्स्प्रेसवर गेल्या दोनदिवसांपूर्वी दगडफेक करून प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला.

परतूर रेल्वे स्थानक असुरक्षित
परतूर : परतूर रेल्वे स्थानकावर देवगिरी एक्स्प्रेसवर गेल्या दोनदिवसांपूर्वी दगडफेक करून प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये रेल्वेचे तीन पोलिस जखमी झाले. अशा घटना वारंवार घडत असल्याने रेल्वे प्रवाशांत प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले असून, रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह त्यांचे कुटुंबियही स्वत:ला असुरक्षित समजू लागले आहेत.
दरम्यान, दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत रेल्वे पोलिसांसह स्थानिक पोलिसांनी गुन्हेगारांविरूद्ध कठोर भूमिका घेऊन रेल्वे स्थानकावरील दगडफेकीसह प्रवाशांना लुटण्याचे, मारहाणीचे प्रकार तातडीने रोखावेत, अशी अपेक्षा रेल्वे प्रवाशांतून व्यक्त होत आहे.
परतूर रेल्वेस्थानकावर १७ रोजी रात्री १० वाजेच्या दरम्यान अज्ञात दरोडेखोरांनी रेल्वे स्थानकातून देवगिरी एक्स्प्रेस दाखल होताच तुफान दगडफेक करण्यास सुरूवात केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशी व रेल्वे कर्मचारी भयभीत झाले.
या दगडफेकीत कर्तव्यावर असलेले रेल्वे पोलिस एन. एन. गंगावणे, जी. आर. राऊत, इ. एम. वाघमारे हे जखमी झाले.
दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या हल्लेखोरांनी स्टेशन मास्तरची केबीनलाही लक्ष्य केले होते. सुदैवाने स्थानकातून देवगिरी एक्सप्रेस लगेच निघाल्याने प्रवाशी या हल्यातून बालंबाल बचावले. परंतु स्थानकावर उतरलेले प्रवासी दगडाच्या भितीने सैरावैरा धावत सुटले. स्थानिक पोलिसांना पाचारण करण्यात आल्यानंतर हे हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाले. तोपर्यंत हल्लेखोरांनी या रेल्वेस्थानकावर मोठा धुमाकूळ घातला.
येथील रेल्वे स्थानकावर गेल्या काही वर्षांपासून अधूनमधून रेल्वे प्रवाशांना मारहाण करीत लूटमारीचे प्रकार घडत आले आहेत. विशेषत: एक-दीड महिन्यास किमान एखादी घटना होते आहे. रेल्वे प्रवाशांना क्षुल्लक गोष्टीतूनही मारहाणीचे प्रकार या स्थानकावर नित्याचे झाले आहेत. विशेष म्हणजे काही दरोड्याच्या घटनाही लक्षवेधी ठरल्या आहेत.
अशा घटना वारंवार घडत असल्याने प्रवाशात प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. रेल्वे प्रशासनाने अशा घटनांची गांभीर्याने दखल घेवून प्रवाशांना संरक्षण दयावे अशी मागणी होत आहे. परंतु दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे अधिकारी व रेल्वे पोलिस या गोष्टींची गांभीर्याने दखल घेत नाहीत, हे वास्तव आहे. गंभीर प्रकारच्या घटना घडल्यानंतर त्या संदर्भात चार सहा दिवस ओरड होते. माध्यमांमधून प्रश्न ऐरणीवर आणला जातो. परंतु त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. परिणामी या परिसरातील अट्टल व सराईत गुन्हेगारांनी लूटमारीचे व दहशत पसरविण्याचे प्रकार कायम ठेवले आहेत.
अधिकारीही भयभीत
स्टेशन मास्तर के. के. प्रसाद म्हणाले की, अशा घटना वारंवार घडत असल्याने हे स्थानक असूरक्षीत बनले आहे. कधी प्रवाशांवर तर कधी आमच्यावर हल्ले होणे हे नित्याचेच झाले आहे. (वार्ताहर)
पोलिसांकडे शस्त्रेच नाहीत
चार-पाच वेळेस प्रवाशांवर हल्ला व रेल्वेवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. रेल्वे प्रशासनाने शस्त्रधारी पोलिसही दिले होते. मात्र, हळूवारपणे पोलिसांकडील शस्त्र काढून घेण्यात आले. संख्याबळी कमी करण्यात आले.
दोन दिवसांपूर्वीच्या घटनेत रेल्वे पोलिस गणवेशात नव्हते, हातात दंडुकाही नव्हता. त्यामुळेच पोलिसांचा वचक कसा राहणार? असा सवाल करीत, प्रवाशांनी याचे भान कर्तव्यावरील पोलिसांना राखायला पाहिजे, असा सूर आवळला आहे. येथील रेल्वे पोलिसांची चौकी सक्षम करावी, तत्पूर्वी हे स्थानक संवेदनशील केंद्र म्हणून नोंद करून, उपाय योजना कराव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.