बोगस स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांवर बडतर्फीचा दंडुका
By Admin | Updated: November 10, 2014 01:18 IST2014-11-10T01:07:34+5:302014-11-10T01:18:42+5:30
व्यंकटेश वैष्णव , बीड शासनाच्या विविध विभागात सध्या कार्यरत असलेल्या बोगस स्वातंत्र्यसैनिकाच्या पाल्यावर बडतर्फीचे हत्यार जिल्हा प्रशासनाने उगारले आहे़ बीड जि़ प़ अंतर्गत शिक्षण

बोगस स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांवर बडतर्फीचा दंडुका
व्यंकटेश वैष्णव , बीड
शासनाच्या विविध विभागात सध्या कार्यरत असलेल्या बोगस स्वातंत्र्यसैनिकाच्या पाल्यावर बडतर्फीचे हत्यार जिल्हा प्रशासनाने उगारले आहे़ बीड जि़ प़ अंतर्गत शिक्षण विभागात विस्तार अधिकारी पदावर काम करीत असलेल्या एकाला अपर जिल्हाधिकारी यांनी बडतर्फ करण्याचे आदेश जि़ प़ चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत़ यामुळे जिल्ह्यातील बोगस स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांचे धाबे दणाणले आहेत़
शासनाने स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन प्रकरणाच्या फेरपडताळणीसाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या अहवालानुसार बीड जिल्ह्यात एकूण २९८ बोगस स्वातंत्र्यसैनिक आहेत़ या बोगस स्वातंत्र्यसैनिकांचे पाल्य जिल्ह्यातील विविध विभागात नौकरी करीत आहेत़ त्यांना शासन सेवेतून बडतर्फ करण्याचा आदेश अप्पर जिल्हाधिकारी, बीड यांनी नुकताच दिला आहे़ यावरून बीड जिल्हा परिषदेंतर्गत आष्टी येथे शिक्षण विभागात कार्यरत मनोरंजन रावसाहेब धस (रा़ जामगाव, ता़ आष्टी) यांना बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत़
दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, ज्यांनी बोगस प्रमाणपत्र दाखवून शासनाच्या विभागात नौकरी मिळवलेली आहे त्यांच्याकडून रूजू झालेल्या दिवसापासून उचलेले वेतन व्याजासह वसूल करावे. आष्टी येथील धस हे २००४ मध्ये जिल्हा परिषदेत नौकरीला लागले होते.
सहा महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील कृषी विभागातील कृषी सहायक व बोगस स्वातंत्र्यसैनिकांचे पाल्य असलेल्या चार जणांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. यानंतर जिल्ह्यातील इतर शासकीय विभागात बोगस प्रमाणपत्रावर नौकरी मिळविलेले अधिकारी कर्मचारी आहेत. त्यांना बडतर्फ करण्याचे आदेश काढण्याच्या हालचाली जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले़