नसूनही दिवसभर बसवेश्वर महाविद्यालयातच राहिले कुंभार सर...

By Admin | Updated: July 2, 2014 00:20 IST2014-07-01T23:46:08+5:302014-07-02T00:20:44+5:30

दत्ता थोरे/हणमंत गायकवाड, लातूर एक प्रेमळ शिक्षक... एक तत्वज्ञानाचा गाढा अभ्यासक.. एक गांधीवादी विचारवंत.. एक बाणेदार प्राचार्य... एक नित्य संशोधक.. एक कनवाळू शिक्षक... डॉ. नागोराव कुंभार सर.

Bachelor's stay in college till now | नसूनही दिवसभर बसवेश्वर महाविद्यालयातच राहिले कुंभार सर...

नसूनही दिवसभर बसवेश्वर महाविद्यालयातच राहिले कुंभार सर...

दत्ता थोरे/हणमंत गायकवाड, लातूर
एक प्रेमळ शिक्षक... एक तत्वज्ञानाचा गाढा अभ्यासक.. एक गांधीवादी विचारवंत.. एक बाणेदार प्राचार्य... एक नित्य संशोधक.. एक कनवाळू शिक्षक... डॉ. नागोराव कुंभार सर. सोमवारी निवृत्त झाले. निवृत्तीच्या पहिल्या दिवशी मंगळवारी सर बसवेश्वर महाविद्यालयात नव्हते. रोज सकाळी साडेसातच्या ठोक्याला त्यांच्या प्रतीक्षेत असलेले महाविद्यालय हीे आज मुलांप्रमाणे सरांविना जणू व्याकुळ झाले होते. तिकडे त्यांच्या निवृत्तीचा पहिला दिवस आप्तेष्ठांना भेटण्यातच गेला.
लातूरच्या शैक्षणिक वर्तुळातील एक बंदे नाणे म्हणजे डॉ. नागोराव कुंभार सर होते. ते सोमवारी निवृत्त झाले. ३९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते सोमवारी बसवेश्वर महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले़ आज मंगळवारी ते प्राचार्यांच्या खुर्चीवर दिसले नाहीत आणि सगळ्याच प्राध्यापक-कर्मचाऱ्यांचा दिवस त्यांच्या आठवणीतच गेला़ महाविद्यालयातील मुले, कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर जणू त्या इमारतीला सर नसल्याची रूखरूख लागली असावी, असे चित्र दिवसभर महाविद्यालयाच्या प्रांगणात होते. त्यांच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात मंगळवारचा दिवस बसवेश्वर महाविद्यालयातील प्राध्यापक-कर्मचाऱ्यांनी घालविला़ प्राचार्य डॉ़नागोराव कुंभार हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील मुखेड चे रहिवासी़
गावातच त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले़ देगलूर च्या देगलूर महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतल्या नंतर पुणे विद्यापीठातून त्यांनी एम़ए़ची पदवी घेतली़ त्यानंतर बसवेश्वर महाविद्यालयात तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले़ ते खरे तत्वज्ञ आहेत़ बहूजन समाजातला विद्यार्थी शिकला पाहिजे, ही त्यांची धारणा़ फुले-आंबेडकरी विचारधारेवर त्यांची दाट निष्ठा़ म्हणूनच ते विद्यार्थ्यां इतकेच कार्यकर्त्यांवर प्रेम करत़ सामान्य माणसांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरूण आंदोलने करणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रपंच कोणी पाहत नाही़ पण कुंभार सरांनी रामकुमार रायवाडीकर सारख्या कार्यकर्त्याला स्वत:च्या वेतनातून घर बांधून दिले़ विद्यार्थी तर जणू जीवनाचा केंद्रबिंदू. त्याच्यासाठी चोवीस तास दालन आणि घराची कवाडे खुली. कुणी भेटला आणि म्हणाला सर अ‍ॅडमिशनला पैसे नाहीत.. फी ला पैसे नाहीत... पुण्याला विद्यापीठात आहे खर्च परवडेना... तर सरांचा हात कधी खिशात जाई हे विद्यार्थ्यालाही कळायचे नाही. विद्यार्थी आज सांगत होते तर उनाडक्या करताना कॅम्पसमध्येच काय कुणी बाहेर जरी दिसला की सर जवळ बोलावून चापटी मारायचे. आईच्या चापटीसारखी त्यात जादू असायची. पण त्यांचा नैतिक दबावच विद्यार्थ्यांवर इतका असायचा की मुले सरांना पाहिलं तरी सुतासारखी सरळ व्हायची. सरांच्या तत्वज्ञान या विषयाला मुळात विद्यार्थीच कमी. त्यात सॉक्रेटीस, अरिस्टॉटल, प्लेटो अशी अवघड नावे आणि त्यांचे तत्वज्ञान. पण सर वर्गावर उभे राहिले की कसे शिकवायचे यावर आज महाविद्यालयात फड रंगले होते. प्राचार्य झाल्यानंतर सर शिकवायला जायचे ते आॅफ पिरियडलाच. कुणाचाही आॅफ असला की सर वर्गावर समजाच. ते गमतीने आॅफ पिरीयडचा सर असल्याचीही म्हणे कोटीही करायचे.
कॉलेज हाच प्राण असलेल्या सरांच्या मनात काय आदर होता हे सांगताना त्यांचे शिष्य राजशेखर सोलापुरे यांनी मंगळवारी महाविद्यालयाच्या प्रांगणात सरांची एक आठवण सांगितली. ते म्हणाले, सर इमारतीसमोर थांबायचे आणि आम्हा प्राध्यापकांना सांगायचे की इमारत आपली आई आहे, ही आपल्याला रोटी देते. आज वयाच्या बंधनामुळे बसवेश्वर महाविद्यालयावर जिवापाड प्रेम करणारा मुलगा दूर गेल्यानंतर महाविद्यालयाची आणि आईपासून दूर गेल्याने डॉ. नागोराव कुंभार सरांसारख्या मुलाच्या अंतरंगात काय भाव असतील, याची कल्पनाच न केलेली बरी.

Web Title: Bachelor's stay in college till now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.