बाळाचा आक्रोश; मातेची दमछाक !
By Admin | Updated: May 9, 2017 23:47 IST2017-05-09T23:46:49+5:302017-05-09T23:47:35+5:30
उमरगा : प्रसुती झालेल्या मातेवर उपचार सुरू असताना अचानक वीज गेल्याने डॉक्टरांनी घेतलेला मोबाईल टॉर्चचा आधाऱ़़़

बाळाचा आक्रोश; मातेची दमछाक !
मारूती कदम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरगा : प्रसुती झालेल्या मातेवर उपचार सुरू असताना अचानक वीज गेल्याने डॉक्टरांनी घेतलेला मोबाईल टॉर्चचा आधाऱ़़़ मध्यरात्री वीज पुन्हा गुल झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी लावलेली मेणबत्ती़़ उकाड्यामुळे बालकांनी फोडलेला टाहो आणि मातेची होणारी दमछाक असे चित्र उमरगा उपजिल्हा रुग्णालयात रविवारी रात्री दिसून आले़ वॉटर फिल्टरच्या जागेतील सिमेंट पोती, अतिदक्षता विभागाला असलेले कुलूप आणि अपुरे कर्मचारी याचाही फटका रुग्णांसह नातेवाईकांना बसताना दिसून आला़
रविवारी रात्री उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील सोयी-सुविधांची ‘लोकमत’ प्रतिनिधीने पाहणी केली़ सुटीचा दिवस असल्याने मोजकेच कर्मचारी रुग्णालयात दिसून आले़ प्रसुतीकक्ष, शस्त्रक्रिया पश्चात कक्ष, महिला-पुरुष आंतररुग्ण विभाग या प्रमुख विभागाशिवाय उर्वरीत ईसीजी, एक्सरे, अति दक्षता हे सर्व विभाग बंद होते. अधून मधून रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची ये-जा सुरु होती. रात्री ९ ते १२ या कालावधीदरम्यान कास्ती (बु) येथील पार्वती महादेव शेकजे व शिल्पा शिवशंकर स्वामी बलसूर, निकिता बालाजी कदेरे सास्तूर या तीन गरोदर मातांनी रुग्णालयात येऊन नोंदणी केली.
रविवारी रात्री सर्वत्र विजेचा लपंडाव सुरु होता. रात्री ९ ते १२ या कालावधीदरम्यान उपजिल्हा रुग्णालयातील तीन वेळा विद्युत पुरवठा खंडीत झाला. रात्री ७ व ७़४० दरम्यान सर्जिकल वॉर्डात सिझरीयन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या़ रुग्ण महिलांवर उपचार सुरू असताना अचानक वीजपुरवठा खंडित झाला़ त्यावेळी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पाटील व अधिपरिचारिका वैशाली जाधव यांनी मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात बाळंत मातांवर वैद्यकीय उपचार केले़ रात्री १०.२६ मिनिटाला पुन्हा विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने प्रसुती कक्षातील प्रतिमा लोखंडे, सकिना पिंजारे या आरोग्य कर्मचाऱ्यांनी मेनबत्तीची शोधा-शोध सुरु केली.
मेणबत्ती लावून वीज येईपर्यंत रुग्णांसह नातेवाईकांना मेणबत्तीचा आधार घ्यावा लागला़ तर रात्री ११ वाजता तिसऱ्यांदा विद्युत पुरवठा पुन्हा खंडित झाला़ त्यामुळे पुन्हा कर्मचाऱ्यांनी मेणबत्ती लावली़ तर काहींनी मोबाईल बॅटरीचा उजेड केला़ त्यावेळी प्रसुती पश्चात कक्षातील १६ महिला उखाड्याने त्रस्त होऊन टाहो फोडणाऱ्या बालकांना आवरताना हैराण झाल्या़ अंधारात कागदाचा पंखा करुन बाळंत आपल्या चिमुकल्यांना हवा देण्याचा प्रयत्न काही महिला करीत होत्या. या रुग्णालयातील दोन्ही इन्व्हर्टर बंद पडले असून, जनरेटरचीही सोय नाही़ परिणामी प्रत्येक रात्री वीज गेल्यानंतर होणारी गैरसोय कायम असल्याचे काहींनी सांगितले़
अंतररुग्ण विभागातील रुग्णांच्या नातेवाईकांना थांबण्यासाठी सुविधा नसल्याने नातेवाईक मिळेल त्या जागेत झोपल्याचे चित्र पहावयास मिळाले़ तर ड्रामा केअर सेंटरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ रुग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर बसविण्यात आले आहे. पिण्याचे पाणी जपून वापरा, असा संदेशही देण्यात आला आहे़ मात्र, मागील अनेक दिवसांपासून सदरील वॉटर फिल्टर नादुरुस्त अवस्थेत असून, या फिल्टरच्या सभोवताली सिमेंटची पोती टाकण्यात आल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे येथील रुग्णालयात लाखो रुपये खर्च करुन अतिदक्षता विभाग सुरु करण्यात आला आहे. मात्र, मागील कित्येक महिन्यांपासून अतिदक्षता विभागासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता होत नसल्याने हा विभाग कुलूपबंद आहे़ रविवारी रात्री वैद्यकीय अधिकारी महावीर कोटेचा, अधिपरिचारीका प्रिया सुतार, वैशाली जाधव, पी.पी. लोखंडे, वर्षा बनसोडे, बालाजी माळवदकर, परसराम वाघमारे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विकास पाटील व इतर मोजक्याच आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा भार असल्याचे दिसून आले.
मध्यरात्री रुग्णांवर उपचार
रविवारी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर बिराजदार या शिक्षकांच्या अंगावर अचानक धाबडे उठल्याने ते शंकर बिराजदार यांच्यासमवेत रुग्णालयात आले. रुग्णालयातील तात्काळ रुग्ण सेवा विभागात अधिपरिचारीका प्रिया सुतार यांच्याकडे नोंदणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. महावीर कोटेचा यांनी बिराजदार यांची तपासणी करुन वैद्यकीय उपचार केले.