बाबासाहेब आंबेडकर कारखाना दोन दिवस राहणार बंद

By Admin | Updated: February 20, 2015 00:07 IST2015-02-20T00:02:25+5:302015-02-20T00:07:07+5:30

उस्मानाबाद : तालुक्यातील केशेगाव येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला लागलेल्या आगीत जवळपास सहा कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज

The Babasaheb Ambedkar factory will remain closed for two days | बाबासाहेब आंबेडकर कारखाना दोन दिवस राहणार बंद

बाबासाहेब आंबेडकर कारखाना दोन दिवस राहणार बंद


उस्मानाबाद : तालुक्यातील केशेगाव येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला लागलेल्या आगीत जवळपास सहा कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे़ नुकसानीची मोजदाद सुरू असून, गुरूवारी रात्रीपर्यंत बगॅसच्या काही भागात विस्तव असल्याने तो विजविण्याचे काम सुरूच होते़ दरम्यान, जवळपास नऊ तास सुरू असलेले आगीचे तांडव विजविण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यासह सोलापूर, बीड जिल्ह्यातील अग्निशमन दलाच्या १५ गाड्या, १६ टँकरने पाणी ओतण्याचे काम करण्यात आले़ रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आग अटोक्यात आली होती़
तालुक्यातील केशेगाव येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्यातील बगॅसला बुधवारी दुपारी तीन-सव्वातीन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली़ या आगीत पाहता पाहता या आगीने उग्र रूप धारण केले होते़ ही आग विझविण्यासाठी उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, सोलापूर, निलंगा, अंबाजोगाई, केज आदी विविध ठिकाणाहून एक दोन नव्हे तब्बल १५ अग्निशमनच्या गाड्या बोलाविण्यात आल्या होत्या़ शिवाय जिल्हा परिषदेचे आठ टँकर व रूईभर व परिसरातील आठ अशा १६ टँकरनीही बगॅसवर पाणी आणून टाकण्यात आले़ मात्र, आक्राळ-विक्राळ रूप धारण केलेली आग अटोक्यात आणण्यासाठी रात्रीचे जवळपास १२ वाजले़ कारखान्याच्या परिसराकडे वाढत असलेले आगीचे लोळ प्रारंभी विझविण्यात आले़ त्यानंतर बगॅसवरील आग अटोक्यात आणण्यासाठी पाणी मारण्यात आले़ आग लागल्यानंतर कारखान्यातील कामगारांना बाहेर काढून कामकाज बंद करण्यात आले़ शिवाय बगॅस परिसरात असलेली बैलगाड्यांसह वाहनेही हलविण्यात आली़ घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ़ प्रशांत नारनवरे यांच्यासह उपविभागीय अधिकारी अभिमन्यू बोधवड, उपविभागीय पोलिस अधिकारी विधाते, तहसीलदार सुभाष काकडे, तुळजापूर ठाण्याचे पोनि ज्ञानोबा मुंढे, बेंबळी पोलीस ठाण्याचे सपोनि प्रशांत पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून मदतकार्याला वेग दिला़ शिवाय कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही आग अटोक्यात आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरूच ठेवले होते़ रात्री जवळपास बारा वाजण्याच्या सुमारास ही आग आटोक्यात आली़ या आगीत ३५ ते ३६ हजार मेट्रीक टन बगॅस जळाल्याने कारखान्याचे जवळपास सहा कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कार्यकारी संचालक आऱव्ही़शिंदे यांनी सांगितले़
या आगीत कारखान्याचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे़ शिवाय बगॅसच्या काही भागात अद्यापही विस्तव असून, तो विझविण्याचे काम सुरू आहे़ त्यामुळे कारखाना अणखी दोन दिवस बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे़ यात कारखान्याचे अणखी ३५ ते ४० लाख रूपयांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The Babasaheb Ambedkar factory will remain closed for two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.