कलाविष्कारातून सामाजिक जाणिवेचा जागर
By Admin | Updated: November 7, 2016 01:01 IST2016-11-07T00:31:46+5:302016-11-07T01:01:05+5:30
औरंगाबाद : इंद्रधनुष्य महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी कलाकारांनी सादर केलेल्या कलाविष्कारातून सामाजिक जाणिवेचा जागर जागविण्यात आला.

कलाविष्कारातून सामाजिक जाणिवेचा जागर
औरंगाबाद : इंद्रधनुष्य महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी कलाकारांनी सादर केलेल्या कलाविष्कारातून सामाजिक जाणिवेचा जागर जागविण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या चारही रंगमंचांवर तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते. प्रत्येक कलाकार सादरीकरणामध्ये व्यस्त होता, तर उर्वरित कलाकार प्रोत्साहन देत होते. विद्यापीठ परिसरातील वातावरण दिवसभर जल्लोषपूर्ण होते. कलाविष्काराचा हा मेळा आणखी तीन दिवस चालणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शनिवारपासून राज्यस्तरीय इंद्रधनुष्य महोत्सव सुरू झाला. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मूकाभिनयातून महिला अत्याचार, जातीभेद निर्मूलन, सीमेवरील जवानांना सलाम, राष्ट्रीय एकात्मता, भूकबळींसह इतर सामाजिक विषयांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लघु नाटिकेतून भोंदूबाबा, पुरुषांची मानसिकता, भ्रष्टाचार निर्मूलन, सोशल मीडिया, वेश्या व्यवसायावर प्रकाश टाकण्यात आला. वादविवाद स्पर्धेत सध्या ज्वलंत प्रश्नावर निघत असलेले विविध संघटना, समाजाचे मोर्चे, दहशतवाद, नक्षलवादावर आसूड ओढले तर आॅन द स्पॉट पेंटिंगमधून बहारदार निसर्गाचे चित्रण करण्यात आले. रात्री उशिरा झालेल्या लोकआदिवासी नृत्यातून आदिवासींच्या संस्कृतीचे दर्शन घडले.
मंदिर, क्रिकेट, राजकारण, हॉस्पिटल, हॉटेलमध्ये काम करणारांना व्यावसायिक म्हटले जाते. मात्र, पोटाची उपजीविका भागविण्यासाठी स्वत:चे शरीर विकणाऱ्या वेश्यांना दलाल, बहिष्कृतपणाची वागणूक देण्यात येते. हा समाजाचा कृतघ्नपणा असल्याची जळजळीत प्रतिक्रिया डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी लघु नाटिकेच्या सादरीकरणातून दिली. वेश्या व्यवसायामध्ये कोणतीही स्त्री स्वखुशीने येत नाही. तिच्यासमोर असलेल्या पोट भरण्याच्या समस्यांमुळेच तिला नाईलाजाने हे काम करावे लागते. मात्र, यातून ती कोणताही भ्रष्टाचार करीत नाही. कोणालाही त्रास देत नाही. तरीही तिलाच दोषी ठरविण्यात येत असल्याची खंतही व्यक्त केली.