प्रबळ उमेदवारांची सर्वपक्षीयांकडून चाचपणी
By Admin | Updated: October 12, 2016 22:24 IST2016-10-12T22:18:40+5:302016-10-12T22:24:58+5:30
बालाजी आडसूळ कळंब तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालीने वेग घेतला

प्रबळ उमेदवारांची सर्वपक्षीयांकडून चाचपणी
बालाजी आडसूळ कळंब
तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालीने वेग घेतला असून, राष्ट्रवादी व काँग्रेसने स्वबळावर तर सेना व भाजपाने स्वबळ किंवा संभाव्य युती गृहीत धरून चाचपणी सुरू केली आहे. असे असले तरी तालुक्यात एका नव्या गटाची भर पडल्याने मतदारसंघात झालेली पुनर्रचना व आरक्षण सोडत यामुळे प्रत्येक ठिकाणची गणिते बदलली असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे नवी गावे, आरक्षण यामूळे सर्वच पक्षाना यंदा मोठ्या कसरतीने निवडणूकाला सामोरे जावे लागणार आहे.
कळंब तालुक्यात २०१२ च्या निवडणूकीत ७ गट व १४ गण होते. परंतु यंदा २०११ च्या जनगणनेनुसार वाढीव लोकसंख्या गृहित धरल्याने यात बदल होऊन गटाची संख्या ८ तर गण १६ झाले आहेत. यमुळे भौगोलिक सलगता व लोकसंख्येच्या सूत्राचा समतोल साधतांना येरमळा गट वगळता इतर सर्वच जुन्या गटाचे नकाशे बदलले आहेत. मंगरूळ हा नवा गट तयार होऊन अस्तित्वातील ७ गटात भौगोलिकदृष्ट्या झालेल्या बदलाचे तालुक्यातील पूर्वीची राजकीय गणिते, इतिहास व संदर्भ यावरही परिणाम आगामी निवडणुकीत होणार असल्याचे दिसून येत आहेत.
सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, सेनेचे चार व काँग्रेसचे एक जि.प. सदस्य तर राकाँचे सहा, सेनेचे सात व काँग्रेसचा एक पंचायत समिती सदस्य असे संख्याबळ आहे. येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुकीत पुन्हा पक्षीय ताकदीचा विचार केला असता राकाँ, सेना, काँग्रेस व भाजपा या क्रमाने पक्षीय ताकद आहे. या ताकदीचा स्वबळावर वापर होतो की युती करून एकीचे बळ दाखविले जाते हे आगामी काळच ठरवणार असला तरी सद्य:स्थितीत सर्वच पक्षांनी आपले ‘मायक्रो प्लॅनींग’ सुरू केले असल्याचे दिसून येते. ज्याठिकाणी गट राखीव झाले आहेत तेथील प्रस्थापित व इच्छूक आत्ता पंचायत समितीच्या गणावर समाधान माणण्याच्या तयारीत आहेत. यासाठी गण ताब्यात ठेवून गट कोणाच्या गळ्यात घालायचा? आपल्या जोडीला कोण बरा राहिल? याची चाचपणी सुरू आहे.
ओबीसी नेतृत्वाचा लागणार कस
तालुक्यातील शिराढोण,मंगरूळ, डिकसळ, खामसवाडी हे राजकीयदृष्ट्या महत्वाचे व तेरणा पट्यातील चार गट ओबीसी प्रवगार्साठी आरक्षित झाले आहेत. आरक्षणामुळे या गटातील प्रस्थापिंताना हादरा बसल्याने पंस गणाचा आधार घ्यावा लागणार आहे. काहींना ही संधीही दुर्लभ आहे. या चारही गटात पक्ष नेतृत्वांना नवीन नेतृत्व पूढे आणावे लागणार असल्याने मोठी कसरत तर करावी लागणार आहे. डिकसळ गटातील राकाँचे तालुकाध्यक्ष रामहारी शिंदे, शिवसेनेचे तालुका प्रमुख रामलिंग आवाड, मंगरूळमधून काँग्रेसचे आप्पासाहेब शेळके, भागवतराव धस, खामसवाडी येथील राकाँचे संजय पाटील, शिवसेनेचे पं.स. सदस्य अमोल पाटील,विद्यमान जि.प. सदस्य सतीश पाटील यांची संधी हुकली आहे. शिराढोणच्या विद्यमान सदस्या कांचनमाला संगवे, डिकसळच्या शिवसेना नेते पांडूरंग कूंभार व पंस सदस्य हरिभऊ कुंभार यांना चांगला ‘स्पेस’ निर्माण झाला आहे.
तीन मतदारसंघात 'बिग फाईट'...
तालुक्यातील आठपैकी येरमाळा, मोहा व नायगाव हे तीन मतदारसंघ खुले असून यातील नायगाव महिलासाठी आहे.या तीन मतदारसंघात बिग फाईट गृहित धरली जात असून सेना, राष्ट्रवादी या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांचा याठिकाणी कस लागणार आहे. या तीन गटाचाही तेरणा पट्यात समावेश असल्याने आपली राजकीय पकड दाखवण्यासाठी मोठी तयारी केली जात आहे. येरमाळा, मोहा, नायगाव या तिन्ही गटात सद्या सेनेचे विद्यमान सदस्य असून या जागा आपल्या पदरात पाडण्यासाठी राकाँला आपले प्रबळ उमेदवार रिंगणात उभे करावे लागणार आहेत. यामुळे खुल्या प्रवगार्तील या तीन जागेकडे सवार्चे लक्ष लागणार आहे.
म्हणे, आम्ही लागलोत कामाला
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रमुख पक्षाच्या तालुका प्रमूखांशी संपर्क साधला असता राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी स्वबळाचा नारा दिला. तर सेना, भाजपाने सावध प्रतिक्रिया दिल्या. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रामहरी शिंदे यांनी नेहमीप्रमाणे पक्ष स्वबळावर लढणार असून उमेदवारांची चाचपणी सुरु असल्याचे सांगितले. काँग्रेसचे जिल्हा चिटणीस भागवतराव धस यांनी स्वबळाचा नारा देत यादृष्टीने गटनिहाय बैठकीचे नियोजन केले असल्याचे सांगितले.
सेनेचे तालुकाप्रमुख रामलिंग आवाड यांनी मित्र पक्षांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तर निश्चित युती होईल. तूर्त तरी गट व गणनिहाय नियोजन सुरू असल्याचे सांगितले.तर भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रा.दिलीप पाटील यांनी यासंदर्भात स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी चर्चा केलीच जाईल. शिवाय याअनुरूप वरिष्ठ स्तरावरुन योग्य तो निर्णय घेतला जाईल असे सांगितले.