बालकाच्या मृत्यूनंतर यंत्रणेला जाग
By Admin | Updated: July 10, 2016 01:05 IST2016-07-10T00:49:22+5:302016-07-10T01:05:12+5:30
वाळूज महानगर : प्रदूषित खामनदीचे पाणी भूगर्भात पाझरल्याने तसेच जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागून त्यात सांडपाणी शिरल्यामुळेच मेहंदीपूरमध्ये गॅस्ट्रोचा उद्रेक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

बालकाच्या मृत्यूनंतर यंत्रणेला जाग
वाळूज महानगर : प्रदूषित खामनदीचे पाणी भूगर्भात पाझरल्याने तसेच जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागून त्यात सांडपाणी शिरल्यामुळेच मेहंदीपूरमध्ये गॅस्ट्रोचा उद्रेक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बालकाचा मृत्यू झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाच्या पथकाने तातडीने मेहंदीपूरला भेट देऊन पाण्याचे नमुने घेऊन ग्रामस्थांना औषधींचे वाटप केले.
मेहंदीपूर येथील गणेश संतोष दळवी (६) या बालकाचा गॅस्ट्रोमुळे मृत्यू झाला होता. शुभम संतोष पवार (८), राजू लखन मोरे(१), कार्तिक अंकुश गायकवाड (१), जय नामदेव पवार (३), आकाश रवी बरडे (१.५), सखू साहेबराव दळवी (४), लक्ष्मी कृष्णा भंगारे(३), प्रतिभा कृष्णा भंगारे (४) या बालकांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी दोघा बालकांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.
अशी पसरली साथ
पिंपरखेडा-मेहंदीपूर ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मेहंदीपूर गावात बोअरच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. बोअरचे पाणी २० लिटर क्षमतेच्या जलकुंभात साठवून नंतर नळयोजनेद्वारे गावात पोहोचविले जाते. जलकुंभाजवळ असलेल्या व्हॉल्व्हमध्ये सांडपाणी जात असल्याने नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळेच गॅस्ट्रोची साथ पसरली असण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात येत आहेत. याशिवाय जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली असून, त्यात सांडपाणी मिसळत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावाजवळून वाहणाऱ्या खामनदीचे दूषित पाणी जमिनीत पाझरल्याने पाण्याचे स्रोेत दूषित झाले आहेत.
ग्रां.प.कडून सापत्न वागणूक
मेहंदीपूर येथील शासकीय गायरान जमिनीवर झोपडीवजा घरे बांधून ३० कुटुंबे वास्तव्यास आहेत. येथील लोकसंख्या २५७ आहे. ० ते १० या वयोगटातील ५४ बालकांचा यात समावेश आहे. बहुतांश कुटुंबप्रमुख ऊसतोड मजूर आणि वीटभट्ट्यांवर कामे करतात. या वसाहतीत सुविधा पुरविण्याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाल्याचे अलका पवार, निर्मला पवार, शोभा सपकाळ, भागुजी निकम, सविता दळवी, यमुना दळवी यांनी सांगितले.
पाणी नमुने तपासणार
जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. आर. एन. देशमुख, गंगापूरचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश घोडके, जिकठाण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वल चव्हाण, आरोग्य सहायक ए. डी. घोरपडे, आरोग्यसेवक व्ही. एस. जक्कल, सहायक गटविकास अधिकारी आर. के. बागडे, विस्तार अधिकारी मंगेश कुंटे, महिला व बालकल्याण विभागाच्या पर्यवेक्षिका ए. आर. कोडगावकर, एम. ए. पाटील, अंगणवाडी कार्यकर्त्या एस. एस. जोशी, निर्मला कीर्तिशाही, सुनीता निकम आदींच्या पथकाने मेहंदीपूरला भेट दिली.
दळवी कुटुंबावर शोककळा
गणेश साहेबराव दळवी या ६ वर्षीय बालकाचा गॅस्ट्रोमुळे शुक्रवारी मृत्यू झाल्यामुळे दळवी कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गणेशचे आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गणेशला काही दिवसांपूर्वीच शाळेत प्रवेश देण्यात आला होता. काळाने अचानक घाला घातल्यामुळे त्याची आई सविता दळवी, मोठा भाऊ मंगेश व लहान बहीण जया हे शोकमग्न झाले आहेत. गणेशची लहान बहीण सखूवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.