कर्ज वाटपास टाळाटाळ..!

By Admin | Updated: July 24, 2014 00:13 IST2014-07-23T23:57:26+5:302014-07-24T00:13:12+5:30

उस्मानाबाद : उस्मानाबाद : मार्च-एप्रिल महिन्यातील गारपीट, पावसाळा सुरू होऊनही पावसाने दिलेली ओढ,

Avoiding debt settlement ..! | कर्ज वाटपास टाळाटाळ..!

कर्ज वाटपास टाळाटाळ..!

उस्मानाबाद : उस्मानाबाद : मार्च-एप्रिल महिन्यातील गारपीट, पावसाळा सुरू होऊनही पावसाने दिलेली ओढ, पेरलेले बियाणेही न उगवल्याने बसलेला आर्थिक भुर्दंड अशा अनेक संकटांच्या ओझ्याखाली सापडलेल्या शेतकऱ्यांना खरीप पिकांचे कर्ज वाटपातही बँकांकडून टाळाटाळ होत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील बँकांना खरीप पीक कर्ज वाटपासाठी ४८२ कोटींचे उद्दिष्ट दिलेले असताना आतापर्यंत केवळ २६२ कोटींचे पीक कर्ज वाटप झाले असून, ५० टक्के पेक्षा कमी पीक कर्ज वाटप केलेल्या आठ बँकाना नोटिसा बजावण्यात आली आहे.
दोन-तीन वर्षांपासून होत असलेला अपुरा पाऊस, त्यातच गेल्या दोन महिन्यांत झालेली गारपीट, वादळी वारे यामुळे जिल्ह्यातील शेतकरी ऐन खरीप पेरणीच्या तोंडावर मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शिवाय पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला तरीही अपेक्षित पाऊस झालेला नाही. अशातही शेतकऱ्यांनी पैशांची उभारणी करून पेरलेले सोयाबीनचे बियाणे जमिनीच्या वर आले नाही. त्यामुळे चोहोबाजूंनी शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा व पैशांअभावी पेरण्या खोळंबू नयेत, या उद्देशाने शासनाने जिल्ह्यातील बँकांना खरीप हंगामासाठी ४८२ कोटी ९४ लाख रूपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. परंतु, २२ जुलै अखेर केवळ ४१ हजार ४२४ शेतकऱ्यांना २६२ कोटी ३१ लाख पीक कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कर्जवाटपाची ही टक्केवारी केवळ ५४ टक्के असून, एवढ्या गंभीर परिस्थितीतही बँकांकडून शेतकऱ्यांच्या कर्ज वाटपात हलगर्जीपणा होत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे ज्या बँकांनी आतापर्यंत कर्ज वाटपाचे पन्नास टक्केही उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही, अशा आठ बँकांना जिल्हा प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)
अलाहाबाद बँक (२२ टक्के), कॅनरा बँक (१९ टक्के), युसीओ बँक (२८ टक्के), अ‍ॅक्सेस बँक (१ टक्के), बँक आॅफ बडोदा (३४ टक्के), स्टेट बँक आॅफ हैदराबाद (२९ टक्के), युनियन बँक आॅफ इंडिया (१० टक्के) आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक (३७ टक्के) यांच्याकडून कर्ज वाटपास टाळाटाळ झाल्याचे समोर आले आहे. या बँकाकडून आतापर्यंत ५० टक्केही पीक कर्ज वाटप झाले नसल्याने त्यांच्या वरिष्ठ कार्यालयांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती लीड बँक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Web Title: Avoiding debt settlement ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.