साथीच्या रोगांना आळा घाला
By Admin | Updated: July 31, 2014 01:26 IST2014-07-31T01:01:37+5:302014-07-31T01:26:45+5:30
वाळूज महानगर : चिकुन गुनिया, डेंग्यू, मलेरिया, कावीळ आदी साथीच्या रोगांमुळे वाळूज महानगरातील रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

साथीच्या रोगांना आळा घाला
वाळूज महानगर : चिकुन गुनिया, डेंग्यू, मलेरिया, कावीळ आदी साथीच्या रोगांमुळे वाळूज महानगरातील रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. डेंग्यूमुळे गेल्या आठवड्यात दोन जणांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, येथे तात्काळ आरोग्य सुविधा सुरू कराव्यात, अशी मागणी काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाळूज महानगरातील स्वच्छतेकडे एमआयडीसी व स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी व डास वाढले आहेत. दूषित पाणी व परिसरातील दुर्गंधीमुळे डेंग्यू, चिकुन गुनिया, हिवताप, मलेरिया, कावीळ आदी साथीच्या रोगांचा फैलाव झाला आहे. डेंग्यूमुळे बजाजनगरात २७ वर्षांचा तरुण व ६ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. बजाजनगरसह वडगाव कोल्हाटी येथेही साथीच्या रोगाचे लोण पसरत आहे. या भागातील साथीच्या रोगांचे अनेक रुग्ण शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. बजाजनगरसह वडगाव कोल्हाटी येथेही शासनाच्या वतीने तात्काळ औषधोपचाराचे वाटप करून वेगवेगळ्या भागांत आरोग्य शिबिरांद्वारे नागरिकांमध्ये आरोग्य जागृती करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा. या परिस्थितीला जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. निवेदनावर जिल्हा सरचिटणीस संजय तायडे, जिल्हा सचिव जनार्दन निकम पाटील, वाळूज महानगर अध्यक्ष शरद पाटील, राजू डोईफोडे, बंडू पुरी, काकासाहेब सुलताने, नामदेव मानकापे, प्रकाश निकम, महिला तालुकाध्यक्ष दुर्गा निंबोळकर यांची नावे आहेत.
बंद पडलेले भूमिगत गटारीचे काम सुरू करा
वाळूज औद्योगिक निवासी क्षेत्र व बजाजनगरात एमआयडीसीच्या वतीने सुरू करण्यात आलेले भूमिगत गटार योजनेचे काम गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. हे काम तात्काळ सुरू करावे, अशी मागणी एमआयडीसी प्रशासनाकडे सामाजिक विचार मंचने केली आहे. बजाजनगर वसाहतीत गटारी उघड्या पडल्या आहेत, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचते, खदानीतील पाण्यामुळे दुर्गंधी व डासांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे नागरिकांना डेंग्यू, मलेरिया, चिकन गुनिया आदी साथरोगांना तोंड द्यावे लागत आहे. अस्वच्छता व दुर्गंधीमुळे बजाजनगरमध्ये दोन जणांचा बळी गेला आहे. एवढे सगळे घडूनही एमआयडीसी प्रशासन ठोस भूमिका घेत नसून, अनेक ठिकाणी सांडपाणी व कचऱ्याने गटारी भरल्या आहेत. याकडे सामाजिक विचार मंचचे अध्यक्ष गजानन नांदूरकर, सचिव केशव ढोले, विकास पाटील, प्रदीप वडतकर, विठ्ठल कांबळे, दिलीप दबडे, चिंतामणी शेटे, सतीश कोरडे, प्रल्हाद माने, नानेश्वर धुर्वे, व्यंकट टेकाडे, मधुकर नाटकर, सातप्पा जगताप, सुधाकर शेवाळे, ज्ञानेश्वर गवळी, गजानन तुपसुंदर, श्रीकृष्ण अंबडकर यांनी निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.