खरेदी केंद्राला लागले टाळे
By Admin | Updated: May 12, 2014 00:10 IST2014-05-11T23:09:27+5:302014-05-12T00:10:40+5:30
लातूर : नाफेडच्या वतीने लातूर जिल्ह्यातील चार ठिकाणी हमीभावाने हरभरा खरेदी केंद्र उघडण्यात आले होते़ परंतु, १० मे रोजी टाळे लागले़

खरेदी केंद्राला लागले टाळे
लातूर : नाफेडच्या वतीने लातूर जिल्ह्यातील चार ठिकाणी हमीभावाने हरभरा खरेदी केंद्र उघडण्यात आले होते़ परंतु, १० मे रोजी हे केंद्र बंद करण्याच्या नाफेडच्या सूचना असल्याने शनिवारी सायंकाळनंतर त्यांना टाळे लागले़ त्यामुळे हरभरा शिल्लक असलेल्या शेतकर्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे़ बाजारपेठेपेक्षा ५०० ते ६०० रूपये दर अधिक मिळत असल्याने शेतकरी या केंद्रावर रांगा लावत होते़ परंतु, हे केंद्र बंद झाल्याने आता शेतकर्यांवर कमी दराने शेतमाल विकण्याची वेळ आली आहे़ जिल्हा मार्केटींग फेडरेशनच्या माध्यमातून नाफेडने लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, उदगीर, औसा, लातूर या ठिकाणी हरभरा खरेदी केंद्र सुरू केले होते़ या केंद्रांना शेतकर्यांनी भरभरून प्रतिसाद दिला़ अगदी चार-चार दिवस रांगेत थांबून आपला शेतमाल विक्री केला़ या चारही केंद्रावर १० मे पर्यंत जवळपास ५८ हजार क्विंटल हरभरा खरेदी झाला आहे़ या माध्यमातून ३१ रूपये प्रतिक्विंटल दराने १८ कोटी रूपये शेतकर्यांच्या पदरी पडत आहेत़ लातूरच्या हरभरा खरेदी केंद्रावरून सर्वाधिक ३४ हजार क्विंटल हरभर्याची खरेदी करण्यात आली़ त्या पाठोपाठ औसा केंद्रात ११ हजार ५०० क्विंटल, उदगीर ८५०० तर अहमदपूरच्या केंद्रात ४५०० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे़ २५ मार्च पर्यंत खरेदी करण्यात आलेल्या हरभर्याचे ६ कोटी रूपये शेतकर्यांना अदा करण्यात आले आहेत़ उर्वरीत शेतमालाची रक्कम उपलब्ध होताच शेतकर्यांना वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव मधुकर गुंजकर यांनी दिली़ दरम्यान, ३१०० रूपये हमीभावाने नाफेडकडून हरभर्याची खरेदी झाल्यामुळे शेतकर्यांचा चांगलाच फायदा झाला आहे़ बाजार समित्यांमधून हरभर्यास सरासरी २४०० ते २५०० रूपये दरम्यान प्रतिक्विंटल दर मिळत होता़ तुलनेने ६०० ते ७०० रूपये अधिक दर मिळत असल्यामुळे शेतकर्यांनी खरेदी केंद्रास पसंती दिली़ या माध्यमातून जवळपास साडेतीन कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम खरेदी केंद्राने दिलेल्या अधिक दरामुळे शेतकर्यांच्या पदरी पडत आहेत़ मात्र अजूनही बर्याच शेतकर्यांकडे हरभरा शिल्लक असल्यामुळे त्यांच्याकडून खरेदी केंद्रास मुदतवाढ मिळण्याची मागणी होत आहे़ गारपीट, अवकाळी पावसामुळे हरभर्याच्या राशीला उशीर झाला होता़ त्यामुळे वेळेत शेतमाल खरेदी केंद्रावर आणता आला नाही़ आता शिल्लक असलेला हरभरा कमी दराने विकावा लागणार असल्यामुळे शेतकर्यांनी मुदतवाढीची मागणी केली आहे़ (प्रतिनिधी) अनुदानही नाही अन् दरही़़़ मार्च - एप्रिल महिन्यात झालेली गारपीट त्यानंतर सातत्याने होत असलेला अवकाळी पाऊस यामुळे हरभर्याच्या राशी खोळंबल्या होत्या़ त्यातच पन्नास टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले नसल्याचे सांगून शासनाकडून एक छदामही मदत मिळाली नाही़ उरला-सुरला शेतमाल आता पाठिशी बांधून बाजारात गेल्यास दर्जेचे कारण समोर करून कमी दर दिला जात आहे़ यात हरभरा खरेदी केंद्राचा आधार होता़ परंतु, ते बंद करण्यात आल्याने आर्थिक फटका बसणार असल्याचे मत शेतकरी बालाजी वाघमोडे, मल्लिकार्जुन चनाळे यांनी व्यक्त केले़