पोलीस दलात एका जागेसाठी सरासरी १५७ उमेदवार
By Admin | Updated: March 22, 2017 18:02 IST2017-03-22T18:02:01+5:302017-03-22T18:02:01+5:30
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) धर्तीवर राज्यातील पहिल्या पोलीस भरतीला औरंगाबाद ग्रामीण पोलीस

पोलीस दलात एका जागेसाठी सरासरी १५७ उमेदवार
बापू सोळंके/ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 22 - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) धर्तीवर राज्यातील पहिल्या पोलीस भरतीला औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाच्या गोकुळ क्रीडा मैदानावर बुधवार सकाळपासून प्रारंभ झाला. एकूण ११४ जागासाठी तब्बल १७ हजार ८०० उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज केले असून एका जागेसाठी १५७ उमेदवार आता झुंजणार आहेत.
ही भरती पारदर्शक व्हावी, यासाठी पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, अप्पर अधीक्षक उज्वला वनकर यांच्यासह सुमारे ४० पोलीस अधिकारी मैदानावर ठाण मांडून आहेत. औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबलच्या ५७ तर जेल विभागाच्या ५७ पदाच्या भरती प्रक्रियेस आज सकाळपासून टी.व्ही. सेंटर येथील ग्रामीण पोलीसांच्या गोकुळ क्रीडा संकुलावर प्रारंभ झाला. पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी म्हणाले की, या पोलीस भरतीसाठी १७ हजार ८०० उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत. प्रति दिन आम्ही एक हजार उमेदवारांची शारिरीक चाचणी घेण्यास आजपासून सुरवात केली. भरती अत्यंत पारदर्शक व्हावी, यासाठी १० सीसीटिव्ही कॅमेरे आणि १२ कॅमेऱ्यांद्वारे व्हिडिओ शुटींग केली जात आहे. उमेदवारास कोणताही आक्षेप असल्यास सीसीटीव्ही अथवा व्हीडिओ शूटिंग पाहून त्याच्या तक्रारीचे निरसन केले जाऊ शकते. या भरतीसाठी आपण स्वत: मैदानावर उपस्थित राहणार आहोत. शिवाय अप्पर अधीक्षक उज्वला वनकर, पाच पोलीस उपअधीक्षकांसह ४० पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही भरती केली जात आहे. या भरतीसाठी सुमारे २५० पोलीस कर्मचारी तैनातत करण्यात आले आहेत.