तीन वर्षांनंतर ओलांडली सरासरी
By Admin | Updated: September 30, 2016 01:16 IST2016-09-30T00:57:14+5:302016-09-30T01:16:49+5:30
जालना : सलग तीन वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत असलेला जालना जिल्हा यावर्षी दुष्काळातून सुकाळात आला आहे. यावर्षी पहिल्यांदाच पावसाने सरासरी ओलांडली.

तीन वर्षांनंतर ओलांडली सरासरी
जालना : सलग तीन वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत असलेला जालना जिल्हा यावर्षी दुष्काळातून सुकाळात आला आहे. यावर्षी पहिल्यांदाच पावसाने सरासरी ओलांडली. त्यामुळे जिल्हाभरातील रान आबादाणी झाल्याचे पाहावयास मिळत आहे. जालना जिल्ह्यात २०१२ साली भीषण दुष्काळ पडला होता. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ही ६८८. ३ मि. मी. आहे. मात्र २०१२ साली संपूर्ण पावसाळ्यात केवळ ३२४ मि. मी. म्हणजे पन्नास टक्क्यांच्याही आत पाऊस पडला होता. त्यानंतर २०१३ साली जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडून पावसाने सरासरी ओलांडली होती. त्यावेळी संपूर्ण पावसाळ्यात ७८८.६ म्हणजे ११० टक्के पाऊस पडला होता. त्यावेळी काही तालुक्यात ओला दुष्काळ पडला होता. पाऊस व गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. २०१४ मध्ये मात्र पावसाने जिल्ह्याला हुलकावणी दिली होती. वार्षिक सरासरीच्या ५० टक्केच म्हणजे ३७७.४ टक्के पाऊस पडला होता. २०१५ मध्येही जिल्ह्यात ५० टक्यांच्याआत पाऊस पडला होता. त्यामुळे सलग तीन वर्ष दुष्काळ दुष्टचक्र जिल्ह्याच्या मागे होते. २०१६ या वर्षी मध्ये मात्र जिल्ह्यावर वरूण राजाची कृपादृष्टी झाल्याने जिल्हा दुष्काळाच्या दृष्टचक्रातून बाहेर पडला. यावर्षी जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडला. मध्यंतरी काही ठिकाणी १० तर काही ठिकाणी १५ दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुनरागमन झाले. परतीच्या पावसानेही जोरदार हजेरी त्यामुळे जिल्ह्यात पावसाने सप्टेंबरमध्येच वार्षिक सरासरी ओलांडली आहे. २९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात एकूण ७२४.४४ मि. मी. म्हणजे ११५. १७ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)