आॅटोचालकांची मनमानी; पहाटे प्रवाशांची गैैरसोय
By Admin | Updated: July 16, 2014 01:25 IST2014-07-16T00:12:10+5:302014-07-16T01:25:06+5:30
सितम सोनवणे, लातूर मंगळवारी पहाटे सव्वाचार वाजता रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी निघालेल्या एका प्रवाशाला चौकातील एका आॅटो चालकांने मनमानी भाडे सांगितल्याने त्याची अडवणूक होत असल्याचे निदर्शनास आले़

आॅटोचालकांची मनमानी; पहाटे प्रवाशांची गैैरसोय
सितम सोनवणे, लातूर
लातूरच्या शिवाजी चौकात फेरफटका मारत असताना मंगळवारी पहाटे सव्वाचार वाजता रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी निघालेल्या एका प्रवाशाला चौकातील एका आॅटो चालकांने मनमानी भाडे सांगितल्याने त्याची अडवणूक होत असल्याचे निदर्शनास आले़
अंबाजोगाईरोड, बार्शीरोड, औसारोड, नांदेडरोड यांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण म्हणून शिवाजी चौक ओळखला जातो़ या चौकात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लातूरच्या वैैभवात भर टाकत आहे़ शिवाजी चौकामध्ये पहाटे ४ वाजल्यापासून तुरळक प्रवासी, पदचारी, आॅटोचालकांची ये-जा चालू राहते़ मुंबई-पुण्याकडून येणाऱ्या बस, ट्रॅव्हल्स शिवाजी चौकात थांबतात़ प्रवाशी उतरतात, आॅटोचालक ‘कुठे जाणार साहेब’ म्हणून विचारतात़ प्रवासी त्यांच्या घराचा पत्ता सांगत भाडे किती म्हणून विचारतात़ त्यावर आॅटोचालक मात्र मनमानी भाडे सांगत असल्याचे दिसून आले़ यात प्रवाशांची अडवणूक मोठ्या प्रमाणात होताना दिसते़
एक प्रवासी मंगळवारी पहाटे सव्वाचारच्या दरम्यान, शिवाजी चौकातील अंबाजोगाईरोडकडे जाणाऱ्या आॅटोपाँर्इंटकडे गेला़ रेल्वे स्थानकाकडे जायचे आहे़ भाडे किती घेणार म्हणून विचारले असता आॅटोचालकाने दीडशे रूपये भाडे सांगितले़ शिवाजी चौकातून रेल्वे स्थानक तीन - चार किलोमीटर अंतरावर आहे़ त्यासाठी चक्क दीडशे रूपयांचे भाडे आॅटोचालकाने सांगितल्याने प्रवाशी शांतपणे उभा राहिला़ त्यावर आॅटोचालक पुन्हा म्हणाला, तुम्ही किती देणार साहेब, १२० तरी द्या़ नाहीतर दोन-तीन पॅसेंजर येऊ द्या़ तिघांमध्ये दीडशे रूपये द्या़ रात्रीच्या वेळी आॅटोचे दीडपट भाडे असते़ हे जरी असले तरी पहाटेच्या वेळी अशा अनेक प्रवाशांना आॅटोचालकांच्या मनमानी भाड्याचा भुर्दंड भरावा लागत आहे़ प्रवाशी आपल्या हातातील घड्याळाकडे व दुसऱ्या प्रवाशाची वाट बघत उभा राहिला़
शिवाजी चौकातील एका हॉटेलचे मालक भैैरू पवार हे कपातील पहिला चहा आणि ग्लासातील पाणी रस्त्याला अर्पण करून दोन्ही हात जोडून परत हॉटेलमध्ये गेले़ आगारातून दोन बस एका पाठोपाठ बाहेर पडल्या़ शिवाजी चौकाला फेरी मारून बस स्थानकाकडे गेल्या़ भाजी मार्केटला जाण्यासाठी काही महिला उभ्या होत्या़ दोन-तीन आॅटो एकाचवेळी येताच भाजी मार्केट किती घेणार असे विचारताच एकाने १०, दुसऱ्याने ७ असे भाडे सांगितले़ त्यात बसून त्या निघून गेल्या़
शिवाजी चौकात अंधार जास्त जाणवत होता़ उड्डाणपुलावरच्याही लाईट बंद होत्या़ महापालिकेचे नागरी सुविधांकडे दुर्लक्ष असल्याचे तसेच सीटी बसचीही उणीवही यावेळी जाणवली़