‘आॅटोमेशन सिस्टीम’ ठप्प

By Admin | Updated: June 1, 2016 00:16 IST2016-05-31T23:53:32+5:302016-06-01T00:16:45+5:30

औरंगाबाद : करदात्यांना विक्रीकराचे रिटर्न भरणे अधिक सोपे जावे यासाठी विक्रीकर विभागाने ‘न्यू आॅटोमेशन सिस्टीम’ घाईघाईत लागू केली.

The 'Automation System' jam | ‘आॅटोमेशन सिस्टीम’ ठप्प

‘आॅटोमेशन सिस्टीम’ ठप्प


औरंगाबाद : करदात्यांना विक्रीकराचे रिटर्न भरणे अधिक सोपे जावे यासाठी विक्रीकर विभागाने ‘न्यू आॅटोमेशन सिस्टीम’ घाईघाईत लागू केली. मात्र आता प्रत्यक्षात अंमलबजावणीत अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात जुनी प्रणाली बंद झाल्याने ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशीच परिस्थिती करदात्यांची झाली आहे. नवीन करदात्यांना मागील दोन महिन्यांपासून व्यवहार करणे कठीण झाले आहे. ही संगणक प्रणाली लागू करणारे देशातील महाराष्ट्र ६ वे राज्य असल्याची बिरुद मिरविणाऱ्या विक्रीकर विभागावर यामुळे नाचक्कीची वेळ आली आहे.
विक्रीकर भरताना करदात्यांना अनेक अडचणी येत असत. यात व्हॅट, सीएसटी, जे-१, जे-२ अ‍ॅनेक्झर फॉर्म भरून विभागाच्या साईटवर वेगवेगळ्या ठिकाणी दाखल करावे लागत होते. मात्र, न्यू आॅटोमेशन सिस्टीममुळे एका युटिलिटीमध्येच सर्व माहिती एका वेळी द्यावी लागणार आहे. तसेच आता खरेदी आणि विक्रीचे प्रत्येक इनव्हॉइस (बिल) द्यावे लागेल. त्यामुळे व्यवहारात व कर भरण्यातही पारदर्शकता येणार आहे. जीएसटी लागू करण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल असल्याचे सांगितले जात होते. राज्यातील करप्रणालीत आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या या ‘न्यू आॅटोमेशन सिस्टीम’बद्दल करदात्यांना जागरुक करणे आवश्यक होते. पण राज्य शासनाने १ एप्रिलपासून ही संगणक प्रणाली लागू करून टाकली. २१ मे रिटर्न भरण्याची अंतिम तारीख होती. मात्र, संगणक प्रणालीतील तांत्रिक अडचणीमुळे मुदत १० जून करण्यात आली आहे. २५ मे पासून नवीन रजिस्ट्रेशन सुरू झाले; पण संगणक प्रणाली कासवगतीने सुरू आहे.
३१ मेपर्यंत अजूनही तांत्रिक अडचणी दूर करण्यात विक्रीकर विभागाला यश आले नाही. १ एप्रिलपासून नवीन संगणक प्रणाली लागू केली. पण नवीन रजिस्ट्रेशनच होत नसल्याने नंबर मिळत नाही. परिणामी, करदात्यांचे व्यवहार सुरू होण्याआधीच ठप्प झाले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, या नवीन संगणक प्रणालीसाठी दोन बड्या कंपन्यांना सुमारे ४०० कोटींचे कंत्राट विक्रीकर विभागाने दिले आहे.

Web Title: The 'Automation System' jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.