औरंगपुऱ्यातील भाजीमंडई उठविली

By Admin | Updated: May 19, 2015 00:53 IST2015-05-19T00:38:32+5:302015-05-19T00:53:32+5:30

औरंगाबाद : मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने सोमवारी औरंगपुऱ्यातील रस्त्यावरील भाजीमंडईही उठविली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लावलेल्या टपऱ्या, हातगाड्या पथकाने जप्त केल्या.

Aurangpura raised the vegetables in Aurangpura | औरंगपुऱ्यातील भाजीमंडई उठविली

औरंगपुऱ्यातील भाजीमंडई उठविली


औरंगाबाद : मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने सोमवारी औरंगपुऱ्यातील रस्त्यावरील भाजीमंडईही उठविली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लावलेल्या टपऱ्या, हातगाड्या पथकाने जप्त केल्या. तसेच रस्त्यावर खाली बसलेल्या विक्रेत्यांनाही हुसकावून लावण्यात आले. परिणामी बऱ्याच दिवसांपासून अरुंद बनलेला हा रस्ता मोकळा झाला.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या पुढाकाराने शहरात वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू झाली. आठवडाभरापासून विविध भागांत कारवाई केली जात आहे. आतापर्यंत गजानन महाराज मंदिर रस्ता, मुकुंदवाडी आणि शहागंज येथील रस्त्यांवरील भाजीमंडई आणि इतर अतिक्रमणे हटविण्यात आली. त्यानंतर मनपाच्या वतीने शहरातील मध्यवर्ती भागात औरंगपुरा येथे कारवाई करण्यात आली. बऱ्याच दिवसांपासून येथे मुख्य रस्त्यावरच भाजीमंडई भरत होती. दुपारी ४ वाजेच्या सुमारास पथकाने येथे कारवाईला सुरुवात केली. दोन्ही बाजूंच्या हातगाड्या, टपऱ्या उचलून जप्त करण्यात आल्या. कारवाई सुरू होताच एकच धावपळ उडाली. अनेक विक्रेत्यांनी घाईघाईने त्यांचे सामान आणि हातगाड्या दुसरीकडे हटविल्या. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही कारवाई सुरूच होती. कारवाईदरम्यान काही महिला विक्रेत्यांना रडू कोसळले. दोन तास चाललेल्या या कारवाईत सुमारे साठहून अधिक टपऱ्या आणि हातगाड्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे सायंकाळी औरंगपुऱ्यातील रस्ता पूर्णपणे मोकळा झाला.
पुंडलिकनगर रस्त्यावरील दुकाने सील
मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने पुंडलिकनगर रोडवरही कारवाई केली. याठिकाणी आजरा मार्केटमधील ११ टपऱ्या हटविण्यात आल्या. आठ महिन्यांपूर्वी मालमत्ता कर थकल्यामुळे येथील ३० दुकाने सील करण्यात आली होती; परंतु नंतरच्या काळात तेथील व्यापाऱ्यांनी हे सील तोडून त्यात पुन्हा व्यवसाय सुरू केला होता. आज त्या सर्वांना हुसकावून लावण्यात आले.

Web Title: Aurangpura raised the vegetables in Aurangpura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.