औरंगाबादची सोशल मीडियावर चमक

By Admin | Updated: February 10, 2017 12:34 IST2017-02-10T12:31:11+5:302017-02-10T12:34:00+5:30

मलिक अंबरने वसविलेल्या औरंगाबाद शहराची पूर्वापार ५२ दरवाजांचे शहर अशी ओळख आहे. या अजोड ओळखीसोबतच आता सोशल मीडियावर औरंगाबादकरांनी शहराची एक वेगळी ओळख निर्माण केली

Aurangabad's social media flashes | औरंगाबादची सोशल मीडियावर चमक

औरंगाबादची सोशल मीडियावर चमक

सुमेध उघडे, ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. १० -   मलिक अंबरने वसविलेल्या औरंगाबाद शहराची पूर्वापार ५२ दरवाजांचे शहर अशी ओळख आहे. या अजोड ओळखीसोबतच आता सोशल मीडियावर औरंगाबादकरांनी शहराची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शहराचे वैशिष्ट्य सांगणारे शेकडो पेज शहरवासीयांनी सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. या पेजेसच्या माध्यमातून जागतिक स्तरावर महाराष्ट्राची ‘पर्यटन राजधानी’ ही शहराची ओळख आणखी बुलंद होत आहे.
 बदलत्या जीवन शैलीत पारंपरिक माध्यमांद्वारे मिळणारी माहिती व प्रसिद्धीचे वलय हे खूप तोकडे पडत आहे. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादला सुद्धा या तोकड्या माध्यमाची झळ बसली आहे. शहरात आणि शहराच्या बाजूस जागतिक कीर्तीची असंख्य ऐतिहासिक पर्यटन स्थळे असताना याची जागतिक स्तरावर म्हणावी तशी दखल नाही. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी अशी कागदोपत्री असणारी ओळख शहराला कसल्याही प्रकारचा थेट लाभ देत नाही. यामुळे शहराची पर्यटन राजधानी ते स्मार्ट सिटी ही ओळख जगाला करून द्यायची असेल तर सोशल मीडियाशिवाय पर्याय नाही. ही कसर औरंगाबादकर स्वयंप्रेरणेने पूर्ण करीत आहेत. फेसबुक व इतर सोशल माध्यमांची जागतिक  स्तरावर मोठ्या प्रमाणावर दखल घेतली जात आहे. या माध्यमाचा सुयोग्य पद्धतीने होणारा वापर नक्कीच औरंगाबादकडे जागतिक पर्यटक आकर्षित करतील आणि ‘औरंगाबाद’  हा ट्रेंड सर्वच माध्यमांवर सातत्याने दिसेल.
 
 
अशी आहेत पेजेसची नावे
औरंगाबाद हिस्ट्री सोसायटी, औरंगाबाद केव्हज,  औरंगाबाद स्मार्ट सिटी,  औरंगाबाद फोटो ग्राफर्स,  औरंगाबाद महानगरपालिका,  औरंगाबाद एअरपोर्ट,  औरंगाबाद वेरूळ-अजिंठा केव्हज,  औरंगाबाद - हिमायतबाग,  औरंगाबाद -बीबी-का-मकबरा,  औरंगाबाद- दौलताबाद किल्ला,  औरंगाबाद दरवाजांचे शहर,  औरंगाबाद लव्हर्स,  औरंगाबाद न्यूज, औरंगाबाद फॅक्टस्,
 
असा होईल फायदा
शहराची इत्थंभूत माहिती देणारी ही पेजेस फेसबुकवर प्रचंड लोकप्रिय आहेत. औरंगाबाद हे नाव जरी सर्च केले तर साहित्य, संस्कृती, सामाजिक, ऐतिहासिक अशा संदर्भात शेकडो पेजेसची यादीच येते. अजिंठा- वेरूळपुरती मर्यादित असणारी शहराची ओळख यामुळे व्यापक होत आहे. शहराची माहिती या पेजेसच्या माध्यमातून जगभर पोहोचत असल्याने पर्यटक शहरात येण्याच्या आधी शहराची माहिती घेऊन केवळ लेणी पाहून परत न जाता शहरात वेळ देतील.
वेरुळ महोत्सवासारख्या जागतिक स्तरावरील कार्यक्रमाच्या आयोजनास जागतिक प्रायोजक मिळतील. पर्यटक वाढल्याने आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या आयोजनाची संख्या वाढेल. पर्यटनातून येणारा महसूल वाढेल. कोणती माहिती होते अपलोड
 
काय होते अपलोड
शहराचे मनमोहक छायाचित्रे,  ऐतिहासिक स्थळांची माहिती, लेण्यांची छायाचित्रे, पर्यटन स्थळांकडे जाणारे मार्ग, कार्यक्रमांची माहिती, अत्यावश्यक सेवा- शहर पोलीस, महानगरपालिका, एअरपोर्ट, रेल्वेस्टेशन, वाहतूक यंत्रणा, हॉस्पिटल यांची माहिती.
यासोबतच काहीतरी वेगळे करू इच्छिणा-या काही मुक्तछंदी ग्रुपची माहितीसुद्धा यावर उपलब्ध आहे.
 
फेसबुकवर औरंगाबाद हे नाव सर्च केले असता जवळपास ८३,००० च्या वर लोक  रोज ‘# औरंगाबाद’ हा हॅश टॅग वापरून शहराबद्दल माहितीचे आदानप्रदान करीत असतात.
 

 

Web Title: Aurangabad's social media flashes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.