औरंगाबादेत मुलांनी केले आई-वडिलांचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 23:58 IST2018-02-13T23:58:53+5:302018-02-13T23:58:58+5:30
‘व्हॅलेंटाईन डे’ला नुसता विरोध करण्यापेक्षा कृतीतून उत्तर देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने मंगळवारी मातृ-पितृ पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात मुला-मुलींनी आपल्या आई-वडिलांची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतले.

औरंगाबादेत मुलांनी केले आई-वडिलांचे पूजन
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘व्हॅलेंटाईन डे’ला नुसता विरोध करण्यापेक्षा कृतीतून उत्तर देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने मंगळवारी मातृ-पितृ पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात मुला-मुलींनी आपल्या आई-वडिलांची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतले.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सायंकाळी मातृ-पितृ पूजन सोहळ्याला सुरुवात झाली. व्यासपीठावर महापौर नंदकुमार घोडेले, हभप रामभाऊ सारडा महाराज, हभप नवनाथ महाराज आंधळे, लक्ष्मण वडने, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, विकास जैन, जि.प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, माजी महापौर कला ओझा आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांनी आपल्या आई-वडिलांची विधीवत पूजा केली व आई-वडिलांनी मुलांना आशीर्वाद दिला. सोहळा भारावून टाकणारा होता.
हभप सारडा महाराज म्हणाले की, संत ज्ञानेश्वर महाराजांनी देव म्हणजे नुसता पंढरपूरचा विठ्ठलच असा संकोचित अर्थ सांगितला नाही, तर ते म्हणतात की, आई-वडीलही देव आहेत. त्यांची सेवा करण्यातच देवभक्तीचा आनंद मिळतो. संस्कृती जपण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे आयोजक अंबादास दानवे यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांनी आई- वडिलांचा महिमा सांगितला.