औरंगाबादेत महिला असुरक्षित

By Admin | Updated: July 4, 2014 01:08 IST2014-07-04T01:00:22+5:302014-07-04T01:08:51+5:30

अबोली कुलकर्णी/ अश्विनी मघाडे , औरंगाबाद शहरात महिला असुरक्षित आहेत. मागील दहा वर्षांत जे घडले नाही ते आज घडत आहे. महिलांना मुक्तपणा वाटत नाही, घराबाहेर पडल्यास त्यांना असुरक्षित वाटते.

Aurangabad women are unsafe | औरंगाबादेत महिला असुरक्षित

औरंगाबादेत महिला असुरक्षित

अबोली कुलकर्णी/ अश्विनी मघाडे , औरंगाबाद
शहरात महिला असुरक्षित आहेत. मागील दहा वर्षांत जे घडले नाही ते आज घडत आहे. महिलांना मुक्तपणा वाटत नाही, घराबाहेर पडल्यास त्यांना असुरक्षित वाटते. महाविद्यालये, कार्यालये, वसतिगृहे, रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या छेडछाडीचे प्रमाण वाढल्यामुळे त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आली आहे. शहरातील ९९ टक्के महिला आज असुरक्षित असल्याचे लोकमतच्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे़
शहरात तरुणींच्या छेडछाडीबद्दल वाढत जाणाऱ्या घटना पाहता त्यांच्या असुरक्षिततेबद्दल सर्वेक्षण करण्याची गरज जाणवली. कॉलेज, आॅफिसला जाणाऱ्या तरुणी आणि महिला यांना दररोज छेडछाडीच्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. तरुणी दिसल्यावर कॉमेंट करणे, पाठलाग करणे, स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे, फोनवरून धमकी देणे असे प्रकार घडतात. त्यामुळे तरुणी मानसिकरीत्या त्रस्त होतात. या घटनांचा त्यांच्या वैयक्तिक आणि शैक्षणिक आयुष्यावर दूरगामी परिणाम होतो. या घटना घडत असताना तक्रार करण्यासाठी असमर्थ आहोत, अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. पोलिसांत तक्रार केल्यास इतर नागरिकांना माहीत होईल, या विचाराने त्या भयभीत होतात. महिला व तरुणी स्वत:ला असुरक्षित मानत असल्याचे सर्वेक्षणात आढळले.
याची भीती वाटते
कॉलेज, आॅफिसला जाताना तरुणींना छेडछाडीच्या घटनांना सामोरे जावे लागते. त्यावेळी त्यांना रस्त्यावरून एकटे फिरणे, विचित्र नजरांचा त्रास, कॉमेंट करणे, विनाकारण मानसिक त्रास, ब्लॅकमेल करून गैरफायदा घेणे, रात्री एकट्याने बाहेर फिरण्याची, चुकीची माहिती देऊन वापर करणे, एकटेपणाची भीती, स्पर्श करण्याची भीती, कॉलेजला जाण्याची भीती, तक्रारीनंतर होणाऱ्या परिणामांची भीती, सोबतीची गरज या सर्व बाबींची भीती वाटते.
घडणाऱ्या घटनांचा आपल्या कौटुंबिक आणि शैक्षणिक आयुष्यावर परिणाम होणार नाही ना, याची त्यांना काळजी वाटते.
प्रतिकार करावा
शहरात वास्तव्यास असलेल्या तरुणी, महिला यांच्या सुरक्षिततेबद्दल सर्वेक्षण के ले असता, असे निदर्शनास आले की, त्या असुरक्षित आहेत; मात्र आलेल्या प्रसंगांना घाबरून न जाता त्यांचा सक्षमपणे सामना करणे गरजेचे आहे.
प्रसंगी आसपासच्या नागरिकांची किंवा पोलिसांची मदत घ्यावी. ज्यामुळे छेड काढणाऱ्या व्यक्तीला शासन होईल. आपल्यासमोर एखादा प्रसंग घडत असेल, तर त्याकडे कानाडोळा न करता, सतर्कपणे त्याला विरोध करावा.
पोलीस तक्रार का करावी वाटत नाही?
काही तरुणी व महिलांनी पोलिसांत तक्रार केली असता त्यांना वाईट अनुभव आला़ पोलिसांनी अनेक प्रकरणांत तक्रार करणाऱ्या महिलेलाच दोषी ठरवले़ तरुणींनी बऱ्याच वेळेस तक्रार करूनदेखील काहीच उपयोग झाला नाही़
उलट पोलिसांनी तरुणींवरच प्रश्नांचा भडिमार करून दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला़ काही तरुणींचे म्हणणे आहे की, पोलिसांत तक्रार केल्यास बदनामीची भीती वाटते़
तक्रार केली तर आणखी त्रास वाढेल, अशीही भीती तरुणींमध्ये आहे़ काही महिलांचे म्हणणे आहे की, पोलीसच त्रास देतात़ छेडछाडीविरुद्ध तक्रार करायला गेल्यास अनेकदा मुलींनाच दोषी धरले जाते, म्हणून ३४ टक्के तरुणी व महिलांना पोलिसांत तक्रार करून काहीच उपयोग होत नाही, असे वाटते़

Web Title: Aurangabad women are unsafe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.