Aurangabad Violence : हिंसाचारात जखमी झालेले सहाय्यक पोलीस आयुक्त कोळेकर यांची प्रकृती गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 16:17 IST2018-05-12T16:16:36+5:302018-05-12T16:17:37+5:30
दगडफेकीत जखमी झालेले सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Aurangabad Violence : हिंसाचारात जखमी झालेले सहाय्यक पोलीस आयुक्त कोळेकर यांची प्रकृती गंभीर
औरंगाबाद : शहरात शुक्रवारी ( दि. १२ ) मध्यरात्री दोन गटात किरकोळ कारणावरुन झालेल्या वादामुळे तुफान हाणामारी झाली. तलवारी, चाकू , लाठ्या-काठ्यांसह जमावाने तुफान दगडफेक केली. यावेळी पोलिसांची वाहने जाळण्यात आणि व त्याच्यावरही दगडफेक करण्यात आली. यात जखमी झालेले सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात अतीव दक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
धार्मिक स्थळांचे नळ कनेक्शन तोडण्याच्या कारणावरुन दोन गट शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आपापसात भिडले. एका गटाने मोतीकारंजा रोडवरील दिसेल त्या दुकानांवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. यात दुकानांबाहेर असणा-या कुलर, सामानासह गाड्यांची तोडफोड, जाळपोळ सुरू केली. हे पाहून दुसरा गटही रस्त्यावर उतरला. दोन्ही बाजूकडील सात ते आठ हजारांचा जमाव रस्त्यावर उतरला होता. याची माहिती मिळताच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस तयारीनिशी घटनास्थळी दाखल झाले.
( Aurangabad Violence : कुठे चाललोय आपण?... 'हे' फोटो अस्वस्थ करतील! )
दहा पोलीस जखमी
मात्र यावेळी अनियंत्रित जमावाकडून पोलिसांच्या वाहनावरच दगडफेक करण्यात आली. यात सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह दहा पोलीस जखमी झाले आहेत. यातील कोळेकर आणि परोपकारी यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर इतर पोलिसांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोळेकर यांच्या कंठास इजा
सहाय्यक आयुक्त कोळेकर यांच्या कंठावर दगड लागल्याने त्यास मोठी इजा झाली आहे. त्यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांच्यावर सध्या अतीव दक्षता विभागात उपचार सुरु असून त्यांच्या कंठाला झालेली इजा खूप गंभीर स्वरुपाची आहे.
( Aurangabad Violence : औरंगाबादमध्ये कशामुळे उडाला हिंसाचाराचा भडका?; 'हे' आहे खरं काळजीचं कारण )