औरंगाबादमध्ये आकाशवाणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यात यश; दुहेरी वाहतुकीचा प्रयोग यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 17:09 IST2018-01-16T16:53:47+5:302018-01-16T17:09:20+5:30
शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या जालना रोडवरील अमरप्रीत चौकानंतर आकाशवाणी चौकात दुहेरी वाहतुकीचा प्रयोग यशस्वी झाला. या प्रयोगामुळे चौकात होणारी सततची वाहतूक कोंडी फोडण्यात शहर वाहतूक शाखेला यश आले.

औरंगाबादमध्ये आकाशवाणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यात यश; दुहेरी वाहतुकीचा प्रयोग यशस्वी
औरंगाबाद : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या जालना रोडवरील अमरप्रीत चौकानंतर आकाशवाणी चौकात दुहेरी वाहतुकीचा प्रयोग यशस्वी झाला. या प्रयोगामुळे चौकात होणारी सततची वाहतूक कोंडी फोडण्यात शहर वाहतूक शाखेला यश आले.
२४ तास वाहनांची वर्दळ असलेल्या जालना रोडवर रोज सकाळी ९ ते १ आणि दुपारी ४ ते ८ या कालावधीत वाहतूक कोंडीचा सामना शहरवासीयांना करावा लागत होता. विशेषत: वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या रस्त्यावर सिडको, मोंढा नाका आणि क्र ांतीचौक येथे उड्डाणपूल उभारण्यात आले आहे, असे असले तरी जालना रोडवरील वाहतूक कोंडी काही कमी झालेली नव्हती. सामान्य नागरिक रोज सकाळ, सायंकाळ वाहतूक कोंडीत अडकून पडत. वाढत्या वाहन संख्येमुळे या कोंडीत दिवसेंदिवस भर पडत होती. विशेषत: आकाशवाणी चौक आणि अमरप्रीत चौकातील वाहतूक कोंडी वाहतूक शाखेसाठी डोकेदुखी ठरली होती. वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सी. डी. शेवगण यांनी वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली महिनाभरापूर्वी दुहेरी वाहतुकीचा पहिला प्रयोग अमरप्रीत चौकात सुरू केला.
महानगरपालिकेच्या सहकार्याने या प्रयोगानुसार एकाच वेळी दोन्ही बाजूने जाणारी वाहने सोडली जातात. हा प्रयोग सुरू करण्यापूर्वी महानगरपालिकेकडून वाहतूक सिग्नलमध्ये दुरुस्ती करून घेण्यात आली आणि चौकात दूरपर्यंत पांढरे पट्टे मारण्यात आले. तीन लेनमध्ये वाहनांची विभागणी करण्यात आली आहे. यात सरळ जाणारी वाहने, डावीकडे वळण घेणारी वाहने आणि उजवीकडून चौक ओलांडणारी वाहने अशी वर्गवारी करण्यात आली. सरळ जाणा-या वाहनांसाठी मधील लेन, तर उजवीकडे वळणा-या वाहनांकरिता दुभाजकाजवळच्या लेनचा वापर करायचा आहे, तर चौकात डाव्या बाजूने वळण घेणा-या वाहनांकरिता रस्त्याच्या डाव्या लेनचा वापर करण्याच्या सूचना वाहतूक सिग्नलवरून वाहनचालकांना मिळते. शिवाय वाहतूक पोलीसही वाहनचालकांना याबाबतचे संकेत देतात. अमरप्रीत चौकात महिनाभरापूर्वी सुरू झालेला प्रयोग यशस्वी झाल्याने आठ दिवसांपूर्वी आकाशवाणी वाहतूक सिग्नल येथे हा प्रयोग सुरू करण्यात आला. तेथेही प्रयोग यशस्वी झाल्याने दोन्ही चौकातील वाहतुकीची कोंडी फोडण्यात पोलीस यशस्वी झाले.
वाहनचालकांनी लेनचा वापर करावा
वाहनचालकांनी बोर्ड वाचून आणि सिग्नल पाहून चौकात लेनवर थांबावे,जेणेकरून त्यांना आणि अन्य वाहनचालकांना त्रास होणार नाही. या प्रयोगानंतर लवकरच जिल्हा कोर्ट चौकातील चौकात बदल करायचा आहे.
- सहायक पोलीस आयुक्त सी.डी. शेवगण