औरंगाबाद शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाची ‘श्रीमंती’ रयाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 08:09 PM2018-02-12T20:09:59+5:302018-02-12T20:12:56+5:30

रयतेचे राज्य स्थापन करून मराठ्यांचा पराक्रम, शौर्याची गाथा सर्वदूर पसरविणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे असलेल्या शहरातील पुराणवस्तू संग्रहालयाकडे मनपाने दुर्लक्ष केल्याने भेट देणार्‍यांची निराशा होत आहे

Aurangabad Shivaji Maharaj Museum is in bad condition | औरंगाबाद शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाची ‘श्रीमंती’ रयाला

औरंगाबाद शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाची ‘श्रीमंती’ रयाला

googlenewsNext
ठळक मुद्देया संग्रहालयात शिवकालीन समाजजीवन आणि युद्धनीतीचा प्रत्यक्ष इतिहास सांगणार्‍या सुमारे चार हजार वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. तत्कालीन विरोधी पक्षनेते नारायण राणे यांच्या हस्ते २६ डिसेंबर, १९९९ रोजी या संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले होते.

औरंगाबाद : रयतेचे राज्य स्थापन करून मराठ्यांचा पराक्रम, शौर्याची गाथा सर्वदूर पसरविणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे असलेल्या शहरातील पुराणवस्तू संग्रहालयाकडे मनपाने दुर्लक्ष केल्याने भेट देणार्‍यांची निराशा होत आहे. सुभेदारी विश्रामगृहाजवळील‘श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालया’ला अधिकृत पार्किंगची व्यवस्था नाही, अपुरे मनुष्यबळ, आधुनिक सुविधांचा अभाव आणि जीर्ण होत असलेली इमारत व भेट देणार्‍या पर्यटकांचा आटणारा ओघ, अशा अनेक समस्यांनी हे संग्रहालय ग्रासलेले आहे.

या संग्रहालयात शिवकालीन समाजजीवन आणि युद्धनीतीचा प्रत्यक्ष इतिहास सांगणार्‍या सुमारे चार हजार वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. तसे पाहिले तर शहरातील प्रमुख आकर्षण स्थळांपैकी एक असलेले हे संग्रहालय वीस वर्षे होऊनही दुर्लक्षित आहे. पर्यटकांनी सांगितल्याप्रमाणे येथे सर्वात मोठी अडचण आहे ती पार्किंग व्यवस्थेची. संग्रहालयाला स्वत:ची अधिकृत पार्किंगची स्वतंत्र जागा नसल्यामुळे सुभेदारीसमोरील मोकळ्या जागेवर गाड्या लावाव्या लागतात. त्यामुळे बाहेरून येणार्‍या पर्यटकांची गैरसोय होते.
संग्रहालयात फक्त चार कर्मचारी आहेत. त्यामुळे पाच दालनांमध्ये ठेवण्यात आलेल्या हजारो वस्तूंची ऐतिहासिक माहिती सर्वच पर्यटकांना देणे शक्य होत नाही. शाळेची सहल आली असता विद्यार्थ्यांना केवळ एक चक्कर मारून आणली जाते. त्यामुळे संग्रहालयाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जातो.

मुंबई-पुण्याच्या संग्रहालयांच्या धर्तीवर ना येथे डिजिटल फलक आहेत, ना आधुनिक सुविधा. स्वच्छतागृहांची अवस्था तर अत्यंत वाईट आहे. भिंतीमध्ये पाणी झिरपल्याने ठिकठिकाणी डाग पडलेले आहेत. त्यामुळे शिवजयंतीच्या निमित्ताने का होईना मनपा प्रशासनाचे इकडे लक्ष जाईल का? असा सवाल इतिहासप्रेमींतून विचारला जात आहे. तत्कालीन विरोधी पक्षनेते नारायण राणे यांच्या हस्ते २६ डिसेंबर, १९९९ रोजी या संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. शिवाजी महाराजांच्या काळातील युद्धात वापरली जाणारे शस्त्रे, दैनंदिन जीवनातील वस्तू, पुरातन नाणी, वस्त्रे, भांडी, चित्रे, हस्तलिखिते, अशा सुमारे चार हजार वस्तू डॉ. शांतीलाल पुरवार, लांबतुरे आणि रुणवाल यांनी दान केल्या आहेत. त्यांना महिन्याकाठी पाच हजार रुपये मानधन दिले जाते. क्युरेटर सर्वेश नांद्रेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार संग्रहालयाला वर्षाकाठी सुमारे चाळीस हजार पर्यटक भेट देतात आणि त्यातून एक ते दीड लाख रुपये उत्पन्न मिळते.

संग्रहालयाची जाहिरातच नाही
बीबीका मकबरा, पाणचक्की, सोनेरी महलप्रमाणे शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाची जाहिरात किंवा प्रचार केला जात नाही. त्यामुळे बाहेरून येणार्‍या देशी-विदेशी पर्यटकांना याविषयी जास्त माहिती होत नाही. पर्यटक आणि संशोधकांना याकडे आकर्षित करण्यासाठी मनपाने विशेष मोहीम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Aurangabad Shivaji Maharaj Museum is in bad condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.