औरंगाबादची दंगल पूर्वनियोजित?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 04:06 IST2018-05-14T04:05:44+5:302018-05-14T04:06:03+5:30
शहरातील नवाबपुरा, राजाबाजार परिसरात उसळलेली दंगल पूर्वनियोजित असावी, या तर्कास पुष्टी देणारे पुरावे घटनास्थळी सापडले आहेत.

औरंगाबादची दंगल पूर्वनियोजित?
औरंगाबाद : शहरातील नवाबपुरा, राजाबाजार परिसरात उसळलेली दंगल पूर्वनियोजित असावी, या तर्कास पुष्टी देणारे पुरावे घटनास्थळी सापडले आहेत. दंगलखोरांनी बाहुबली चित्रपटात वापरलेल्या गुलेरसारखा गावठी शस्त्राचा वापर दंगलीत केला. इमारतीवर साठवलेले दगडगोटे, पेट्रोल बॉम्बसाठी लागणाऱ्या वाती आणि मिरची पूडचा साठा पोलिसांच्या हाती लागला आहे.
जुन्या शहराला वेठीला धरणाºया जातीय दंगलीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. दंगलीत पेट्रोलबॉम्ब, दगडगोटे मारण्यासाठी बाहुबली, पद्मावत चित्रपटात दाखविलेल्या गुलेरचा वापर करण्यात आला. रस्त्यावरील दोन खांबांना मोठे रबर बांधून, त्याच्या मध्यभागात पोतडे ठेवले होते. या पोतड््यात फेकण्यात येणारे साहित्य ठेवण्यात येत होते. या पोतड्याला पाठीमागे ताणून धरल्यानंतर त्यातील दगडगोटे, गोट्यासह इतर साहित्य दूरवर फेकले जात असल्याचे दिसून आले. नवाबपुरा ते राजाबाजार रस्त्यावर गोट्यांचा खच पडल्याचे दिसून आले. गोफणीतून या गोट्यांचा मारा केला जात होता. नवाबपुरा चौकातील चार मजली इमारतीच्या गच्चीवर पोलिसांना दगडांचा साठा आढळून आला आहे. या ठिकाणावरून दगड मारण्यात येत होते. इमारतीच्या टेरेसवरील दगडगोट्यांची कल्पना नसल्याचे इमारतीचे मालक अब्दुल समद यांनी ‘लोकमत’ला सांगितले.