औरंगाबादची ओळख आता औद्योगिकनगरी अशीही
By Admin | Updated: August 10, 2014 02:04 IST2014-08-10T01:47:09+5:302014-08-10T02:04:29+5:30
औरंगाबादची ओळख आता औद्योगिकनगरी म्हणूनही दृढ होते आहे,

औरंगाबादची ओळख आता औद्योगिकनगरी अशीही
औरंगाबाद : डीएमआयसीमुळे सर्वांनाच दृष्टिकोन बदलावा लागला. त्यामुळेच ऐतिहासिक औरंगाबादची ओळख आता औद्योगिकनगरी म्हणूनही दृढ होते आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग राज्यमंत्री सचिन अहिर यांनी शनिवारी (दि. ९) येथे आयोजित कार्यक्रमात केले.
‘डीएमआयसी : औरंगाबादचा बदलता चेहरा’ या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, हा प्रकल्प एवढा मोठा आहे की, प्रारंभी प्रत्येकालाच तो प्रत्यक्षात येण्याविषयी शंका होती. परंतु आम्ही अंमलबजावणी केली व चित्र बदलले. डीएमआयसीची सर्वच प्रक्रिया आमच्यासाठी ‘लर्निंग प्रोसेस’ होती. या प्रकल्पावर काम करताना आम्हा सर्वांनाच आपला दृष्टिकोन बदलावा लागला.
जुन्या भूसंपादन कायद्यानुसार एवढे मोठे भूसंपादन शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या जमिनीला बाजारभाव दिला. बिडकीनच्या शेतकऱ्यांना तर २३ लाख रुपये एकरी भाव दिला. त्यामुळे आता अनेक शेतकरी आमच्याकडे येऊन पुढील संपादन केव्हा करणार, अशी विचारणा करीत आहेत. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांना जी १५ टक्के जागा परत द्यायची आहे, ती मूलभूत सोयी- सुविधा विकसित करूनच द्यावी, असाही निर्णय घेतला.
डीएमआयसीमुळे या भागात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. पर्यावरणपूरक औद्योगिक शहर येथे उभे राहील. मराठवाड्यात आकाराला आलेले आॅटो क्लस्टर, जालन्यातील स्टील क्लस्टर हे येथील उद्योजक व कामगारांची बदललेली मानसिकता दर्शविते, असे सांगून अहिर म्हणाले, महाराष्ट्रात आता उद्योग उभारणीसाठी चाकणनंतर दुसरी पसंती औरंगाबादला मिळते आहे. या शहराची ओळख आता औद्योगिकनगरी म्हणून होते आहे.