मार्च- एप्रिलमध्ये औरंगाबाद महापालिका निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:21 IST2021-02-05T04:21:28+5:302021-02-05T04:21:28+5:30
औरंगाबाद : महानगरपालिकेची निवडणूक येत्या मार्च किंवा एप्रिलमध्ये होईल, असे संकेत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी येथे दिले. या ...

मार्च- एप्रिलमध्ये औरंगाबाद महापालिका निवडणूक
औरंगाबाद : महानगरपालिकेची निवडणूक येत्या मार्च किंवा एप्रिलमध्ये होईल, असे संकेत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी येथे दिले. या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सिडकोतील लीजवरील घरे फ्री होल्ड करण्याचा निर्णय होईल, असे त्यांनी संपादकांसोबतच्या चर्चेत सांगितले.
शिवसेनेचे वरिष्ठ नेते औरंगाबादेतील बुद्धिवंत, उद्योजक, पत्रकारांशी सातत्याने चर्चा करताना दिसत आहेत. या प्रश्नावर ते म्हणाले की, निवडणुका जवळ आल्या आहेत. कोरोना काळात विकासकामांना गती देता आली नव्हती. आता ती धडाक्याने पूर्ण करत आहोत हे नजरेस आणून देणे, हा या मागचा हेतू आहे. आगामी निवडणुकीत शिवसेनेचे नेतृत्व करणारे नवे चेहरे दिसतील, असे संकेत देताना ते म्हणाले की, नेहमीच्या चेहऱ्यांच्या पलीकडे पाहिले पाहिजे. जुन्या नेत्यांमध्ये किती दिवस अडकून राहणार, असे सूचक विधान त्यांनी केले.
भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादी या दोघांबरोबरच्या युतीमध्ये आणि कार्य पद्धतीत काय फरक आहे, या प्रश्नावर त्यांनी सगळे सारखेच असतात. सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती ते महत्त्वाचे. आता ती आमच्याकडे आहेत. भाजपच्या कार्यकाळात उद्योगांशी परस्पर सहकार्यांचे करार मोठ्या संख्येत झाले; पण अगदी बोटावर मोजावे इतके उद्योग आले; कारण हा करार एक सोहळा असायचा. उद्योगाची गुंतवणुकीची ऐपत तपासली जात नव्हती. आता जेवढे करार झाले ते उद्योग येतील. ‘टेस्ला’ या बहुचर्चित उद्योगाने बंगळुरूत उद्योग उभा करण्याचा निर्णय घेतला, हे वृत्त सत्य नाही.
चौकट
अजित पवारांचा डॉमिनन्स
सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांचा वरचष्मा दिसतो. या प्रश्नावर त्यांचा डॉमिनन्स दिसत असला तरी प्रत्यक्षात तो नाही, अशी मल्लिनाथी त्यांनी केली.