औरंगाबाद : जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिन्यांवर चितेगाव, बिडकीन, ढोरकीन, इसापूर आणि पिंपळवाडी या पाच ग्रामपंचायतींना पाण्याचे कनेक्शन देण्यात आले आहेत. या ग्रामपंचायतींनी पाणीपट्टीच भरलेली नाही. वारंवार पाठपुरावा करून आणि नोटिसा पाठवूनही त्याची दखल घेतली जात नाही. या ग्रामपंचायतींकडे मनपाचे तब्बल ३७ कोटी रुपये थकले आहेत.
जायकवाडी ते नक्षत्रवाडी या ५५ कि. मी. अंतरात ग्रामपंचायतींना राज्य सरकारच्या सूचनेनुसार पाणी देण्यात आले. पाणीपट्टी महानगरपालिकेकडे जमा करावी, असे आदेशही शासनाने दिले होते. महानगरपालिकेने पिंपळवाडी, इसापूर, ढोरकीन, बिडकीन आणि चितेगाव या पाच ग्रामपंचायतींना कनेक्शन दिले. पाणी न दिल्यास जलवाहिनी फोडून नागरिक पाणी घेत असत.
मागील अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतींनी पाणीपट्टीची रक्कमच भरलेली नाही. मनपानेही वसुलीकडे दुर्लक्ष केले. दरवर्षी मार्च महिना येण्यापूर्वी मनपाला ग्रामपंचायतींकडे किती पैसे थकले याची आठवण येते. मार्च महिना संपला तर पुन्हा आलबेल होते. ४० वर्षांपासूनची ही थकबाकी कोटीच्या घरात गेली आहे.
पाच ग्रामपंचायतींकडे ३७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. मनपाने जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाला पत्रव्यवहार सुरू केला आहे. राज्य सरकारकडेही पाणीपट्टीच्या थकबाकी रकमेची मागणी केली; परंतु जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेकडून मनपाला पाणीपट्टीची थकबाकी देण्यास टाळाटाळ होत आहे. पाच ग्रामपंचायतींकडे पाणीपट्टीची ३७ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती मनपाचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी आयुक्तांकडे सादर केली आहे.