कच-यातून काढले औरंगाबाद महानगरपालिकेने अंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:13 IST2018-03-13T00:13:23+5:302018-03-13T00:13:30+5:30
शहरातील कचरा कोंडीचा मुद्या राज्य पातळीवर गाजायला सुरुवात होताच देवेंद्र फडणवीस सरकारने लगेचच हस्तक्षेप करून हा प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्यावर जबाबदारी सोपविली. त्यानंतर हळूहळू मनपा प्रशासनाने या प्रकरणातून अंग काढून घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

कच-यातून काढले औरंगाबाद महानगरपालिकेने अंग
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील कचरा कोंडीचा मुद्या राज्य पातळीवर गाजायला सुरुवात होताच देवेंद्र फडणवीस सरकारने लगेचच हस्तक्षेप करून हा प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्यावर जबाबदारी सोपविली. त्यानंतर हळूहळू मनपा प्रशासनाने या प्रकरणातून अंग काढून घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी स्वत:च्या बदलीच्या हालचालींना वेग दिला आहे. कचरा प्रश्नाच्या टोलवाटोलवीत औरंगाबादकरांना आणखी काही दिवस या कोंडीचा त्रास सहन करावा लागणार हे निश्चित.
शुक्रवार, १६ मार्चला कचरा कोंडीस एक महिना पूर्ण होत आहे. मागील एक महिन्यात महापालिका प्रशासनाला कचरा कोंडी फोडता आली नाही. विधानसभेत या मुद्यावर विरोधकांनी वनवा पेटविल्यानंतर राज्य शासन खडबडून जागे झाले. दुसºयाच दिवशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांना कचरा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी औरंगाबादेत पाठविण्यात आले. त्यांनी महापालिका आणि महसूल विभागाला पंचसूत्री कार्यक्रम आखून दिला. मागील चार दिवसांमध्ये या पंचसूत्रीवर मनपाने काहीच काम केले नाही. विभागीय आणि मनपा आयुक्त निव्वळ बैठकांवर बैठका घेण्यात मग्न आहेत. शहरात हजारो मेट्रिक टन कचरा पडून आहे. हा कचरा कसा दूर करता येईल, यावर अजिबात कृती करण्यात आलेली नाही. मनपा कचरा प्रश्नातून आपले अंग काढून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. शासनाने विभागीय आयुक्तांवर जबाबदारी सोपविली तर त्यांनीच संपूर्ण सोपस्कार पूर्ण करावेत अशा आविर्भावात मनपा प्रशासन वागत आहे.
कचरा जाळणाºयांवर फौजदारी
शहरात शेकडो ठिकाणी कचºयाचे डोंगर साचले आहेत. सकाळी आणि रात्री नागरिक दुर्गंधीमुळे कचºयाला आग लावत आहेत. त्यामुळे शहरात प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. आता यापुढे कचरा जाळणाºयांवर फौजदारी कारवाई करण्याचा फतवा मनपा प्रशासनाने काढला आहे. कचरा उचलायचे दायित्व सोडून प्रशासन आता सर्वसामान्यांवर गुन्हे दाखल करणार का?
सर्व काही आलबेल....
मनपाच्या वॉर्ड अधिकाºयांपासून वरिष्ठांपर्यंत शहरात सर्व काही आलबेल आहे, असेच चित्र भासविण्यात येत आहे. सोमवारी प्रशासनाने एका बैठकीत दिलेली आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे. शहरातील नऊ प्रभागांपैकी सहा प्रभागांमध्ये फक्त १९०० मेट्रिक टन कचरा पडून आहे. ४ हजार मेट्रिक टन कचरा उचलण्यात आल्याचा खोटा दावाही प्रशासनाने केला. वास्तविक पाहता शहरातील मुख्य रस्त्यांवर गल्लीबोळांत किमान ७ हजारांहून अधिक मेट्रिक टन कचरा पडून आहे.
प्रक्रिया केंद्राची माहिती नाही
शहरात मनपाचे ९ प्रभाग आहेत. त्यातील सहा प्रभागांमध्ये ओला कचरा वेगळा करून खतनिर्मिती करण्यात येते, असा दावा मनपाकडून केला जात आहे. या सहा ठिकाणांच्या नावांची माहिती ‘लोकमत’ने मनपा प्रशासनाकडे मागितली आहे. रात्री उशिरापर्यंत ही सहा ठिकाणे कोणती हे मनपा प्रशासनाला सांगता आली नाही.