औद्योगिक क्षेत्रात औरंगाबाद आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:03 IST2021-06-29T04:03:26+5:302021-06-29T04:03:26+5:30
औरंगाबाद : औद्योगिक क्षेत्रात औरंगाबाद आघाडीवर आहे व यापुढेही सातत्याने आघाडीवरच राहील. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमध्ये राज्यात नमुनेदार अशी ऑरिक ...

औद्योगिक क्षेत्रात औरंगाबाद आघाडीवर
औरंगाबाद : औद्योगिक क्षेत्रात औरंगाबाद आघाडीवर आहे व यापुढेही सातत्याने आघाडीवरच राहील. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमध्ये राज्यात नमुनेदार अशी ऑरिक सिटी उभारण्यात आली आहे. भारताचा औद्योगिक विकास ऑरिक सिटीतून दिसतो, असे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.
चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरच्या (सीएमआयए) नूतनीकरण केलेल्या वास्तूचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार अंबादास दानवे, आमदार अतुल सावे, ‘सीएमआय’चे अध्यक्ष कमलेश धूत, उपाध्यक्ष शिवप्रसाद जाजू, सचिव सतीश लोणीकर, बिल्डिंग समितीचे अध्यक्ष गिरीधर संगेनेरिया याशिवाय मासिआ, जिल्हा व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी देसाई म्हणाले, महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती झपाट्याने होत आहे. कोरोनासारख्या कठीणकाळात उद्योग विभागाने देश-विदेशांतील जवळपास ६० कंपन्यांसोबत दोन लाख कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. औरंगाबादबरोबरच राज्यातील इतर जिल्ह्यांचाही सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. ‘सीएमआयए’चे उद्योग क्षेत्रातील योगदान महत्त्वाचे आहे. उद्योग विकासासाठी सातत्याने ‘सीएमआयए’कडून अभ्यासपूर्ण विषयाची मांडणी केली जाते. ती उद्योग विकासासाठी पूरक आहे.
आमदार सावे यांनी चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील रस्ते सुधारण्याची मागणीही केली. यावेळी आमदार दानवे, ‘सीएमआयए’चे पदाधिकारी जाजू, संगेनेरिया यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक धूत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश लोणीकर यांनी केले.
चौकट........
उद्योगांचा केला गौरव
कोविड काळात प्रशासनाला साथ देणाऱ्या उद्योजकांचा पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यात युनायटेड ब्रेवरीज, हारमन फिनोकेम, ऐरॉक्स टेक्नॉलॉजी, अजंटा फार्मा आणि कोल्हेर पॉवर आदींसह विविध दात्यांचा समावेश होता. कोविड काळात ‘सीएमआयए’ने घाटी परिसरात ऑक्सिजन प्लांट उभारला, विविध वैद्यकीय सामुग्री दिली. त्याचे कौतुक यावेळी देसाई यांनी केले.