गोल्डन ट्रँगलमध्ये येणार औरंगाबाद शहर
By Admin | Updated: December 15, 2015 00:05 IST2015-12-14T23:53:04+5:302015-12-15T00:05:09+5:30
विकास राऊत , औरंगाबाद दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) नंतर औरंगाबाद शहर आणि मराठवाड्याला गोल्डन ट्रान्सपोर्ट ट्रँगलमध्ये आणण्यासाठी

गोल्डन ट्रँगलमध्ये येणार औरंगाबाद शहर
विकास राऊत , औरंगाबाद
दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) नंतर औरंगाबाद शहर आणि मराठवाड्याला गोल्डन ट्रान्सपोर्ट ट्रँगलमध्ये आणण्यासाठी १२ हजार १४० कोटी रुपयांचा नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोग्राम (एनएचडीपी) तयार करण्यात आला असून, त्याचे भूमिपूजन २५ डिसेंबर रोजी केंद्रीय रस्ते, वाहतूक, महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होत आहे. चिकलठाणा येथील केम्ब्रिज शाळेजवळ सायंकाळी ४ वा. होणाऱ्या या कार्यक्रमाला केंद्र व राज्यातील मंत्र्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित असतील.
१२ हजार कोटींचा राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग विकासाचा अंदाजे ८ हजार कोटींचा सीआरएफचा कार्यक्रम आहे. आगामी काही वर्षांत डीएमआयसी आणि एनएचडीपीमुळे मराठवाडा आणि औरंगाबाद शहर देशातील महत्त्वाचा विकसित भौगोलिक प्रदेश म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे. यामुळे औरंगाबाद शहराला ऐतिहासिकेसोबतच ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर सिटी म्हणूनही ओळख मिळू शकेल. देशभरात वाहतूक विकासासाठी ७-फेसचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. त्यातील ३ टप्पे पूर्ण झाले असून, चौथ्या टप्प्यात औरंगाबाद व सीआरएफ (सेंट्रल रोड फंड वर्क्स) च्या रस्ते विकासाला प्रारंभ होईल. सीआरएफमधील रस्ते राज्य बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात येतील, तर एनएचएआय (नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडिया) यांच्याकडे एनएचडीपीअंतर्गत निर्माण होणाऱ्या रस्त्यांचे नियंत्रण राहील, असे सूत्रांनी सांगितले.
जालना रोडचा समावेश रा.म.मध्ये
जालना रोड सध्या सहापदरी असून, त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. येडशी ते औरंगाबाद ते धुळे महामार्गाच्या कामातच ९ कि़ मी. अंतराच्या जालना रोडचे काँक्रिटीकरण होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र.२११ औरंगाबाद शहर चौपदरीकरण येडशी ते औरंगाबाद ते धुळे आणि इतर रस्त्यांचे एकत्रित भूमिपूजन करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.