औरंगाबाद-चाळीसगाव रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण
By Admin | Updated: July 9, 2014 00:53 IST2014-07-09T00:48:40+5:302014-07-09T00:53:12+5:30
प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी आज आपल्या पहिल्या रेल्वे अर्थसंकल्पात ‘औरंगाबाद-चाळीसगाव’ या ७५ कि.मी. नव्या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास मंजुरी दिली आहे.

औरंगाबाद-चाळीसगाव रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण
प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद
केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी आज आपल्या पहिल्या रेल्वे अर्थसंकल्पात ‘औरंगाबाद-चाळीसगाव’ या ७५ कि.मी. नव्या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास मंजुरी दिली आहे. यामुळे भविष्यात दक्षिण मध्य रेल्वे-मध्य रेल्वेशी जोडली जाईल . यामुळे पर्यटनाची राजधानी औरंगाबाद व देशाची राजधानी दिल्लीतील अंतर २०० कि.मी.ने कमी होईल.
औरंगाबाद- धुळे राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादान करण्यात येणार आहे. याच महामार्गाला समांतर रेल्वेमार्ग तयार व्हावा, या मागणीस सर्वप्रथम ‘लोकमत’ने वाचा फोडली होती. ‘अवघ्या अर्ध्या तासात कन्नड’ या मथळ्याखालील बातमी २५ मे २०१४ रोजीच्या अंकात प्रसिद्ध झाली होती. या प्रश्नी लोकप्रतिनिधी व रेल्वे विकास समितीने दिल्ली दरबारात आवाज उठवावा, असे आवाहनही केले होते. त्याचे फलित म्हणजेच नवीन रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास मिळालेली मंजुरी होय. औरंगाबाद ते चाळीसगावला रेल्वेने जाण्यासाठी मनमाडमार्गे जावे लागते. हा १६० कि.मी.चा प्रवास करण्यासाठी ३ तास खर्च करावे लागतात. मात्र, थेट औरंगाबाद ते चाळीसगाव हा ७५ कि.मी.चा नवीन रेल्वेमार्ग झाल्यास ८५ कि.मी.ने अंतर कमी होईल व अवघ्या १ तास २० मिनिटांत चाळीसगावला पोहोचता येईल, तर कन्नड अर्ध्या तासात गाठता येईल. तसेच चाळीसगाव- जळगाव- भुसावळ- खांडवामार्गे रेल्वे थेट दिल्लीला पोहोचेल. यामुळे मनमाड, धुळेमार्गे जाण्याची गरज नाही. सुमारे २०० कि.मी.चे अंतर कमी होऊन दिल्ली- औरंगाबादचा प्रवास ३ तासांनी कमी होईल.
यापूर्वीच यूपीए सरकारने सोलापूर- धुळे या ४५३ कि.मी.च्या राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी दिली. त्यातील औरंगाबाद ते चाळीसगाव घाटापर्यंतचे भूसंपादन होणे बाकी आहे. रस्त्यासाठी २०० फूट रुंद जागा संपादित करण्यात येणार आहे. यात मधोमध ८० फुटांचा रस्ता तयार करण्यात येईल. दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ६० फूट जागा (१२० फूट) जागा शिल्लक राहते. यात दीड मीटरच्या रेल्वेलाईनला १२ फूट जागा लागते. रेल्वेच्या डब्यांची रुंदी विचारात घेता रेल्वेला एका मार्गासाठी १५ फूट जागा सोडावी लागते. म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ३० फूट जागा रेल्वेसाठी दिली तरीही ९० फुटांची जागा शिल्लक राहते. रेल्वेलाईनचा प्रस्ताव मंजूर झाला तर चाळीसगाव
घाटातील बोगद्यासाठी ३० मीटरची अतिरिक्त जागा वाढविता येऊ शकते. यामुळे औरंगाबाद- चाळीसगाव महामार्गासोबत रेल्वेमार्गही तयार होईल.
अतिरिक्त खर्च
औरंगाबाद ते धुळे या राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे. औरंगाबाद ते चाळीसगाव हा नवा रेल्वेमार्ग याच महामार्गाच्या बाजूने असणाऱ्या अतिरिक्त जागेतून केल्यास रेल्वेला कोणतेच भूसंपादन करण्याची गरज पडणार नाही. रस्ता बोगद्यासाठी ३४०० कोटींचा खर्च मंजूर झाला आहे.
रेल्वे विभागाला संपूर्ण सहकार्य
राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण (एनएचएआय)चे प्रकल्प संचालक जे.यू. चामरगोरे यांनी सांगितले की, सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गाला समांतर रेल्वेमार्ग करावा हा आमचा प्रस्ताव रेल्वेमंत्र्यांनी मंजूर केल्याचा आनंद झाला. औरंगाबाद- चाळीसगाव सर्वेक्षणासाठी आम्ही रेल्वे विभागाला संपूर्ण सहकार्य करणार आहोत. केंद्र सरकारने आमच्यावर जबाबदारी टाकल्यास आम्ही ती पूर्ण करू.
निधी उपलब्ध करून द्यावा
मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी सांगितले की, केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात औरंगाबाद- चाळीसगाव या नवीन रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षण करण्यास मंजुरी दिली आहे. मात्र, त्यासाठी निधी किती मंजूर करण्यात आला, याची माहिती दिली नाही. निधी उपलब्ध झाल्याशिवाय सर्वेक्षणासाठी टेंडर प्रक्रिया सुरू करता येत नाही. सर्वेक्षणाच्या मंजुरीसोबत निधीची घोषणा करणे आवश्यक होते. मात्र, हा नवीन रेल्वेमार्ग झाल्यास औरंगाबादच्या विकासाला मोठी गती मिळेल.
सध्याचा रेल्वेमार्ग
औरंगाबाद- मनमाडमार्गे चाळीसगाव
कि. मी.- १६० कि.मी.चा मार्ग
प्रवासाचा वेळ - ३ तास
संकल्पित रेल्वेमार्ग झाल्यास
दौलताबाद - कन्नडमार्गे चाळीसगाव
कि. मी. - ७५ कि. मी. चा मार्ग
प्रवासाचा वेळ - १ तास २० मिनिटे