औरंगाबाद-अजिंठा रस्ता होणार चौपदरी

By Admin | Updated: November 14, 2015 00:54 IST2015-11-14T00:48:38+5:302015-11-14T00:54:38+5:30

विकास राऊत , औरंगाबाद जगप्रसिद्ध अजिंठा लेण्या औरंगाबाद ते फर्दापूर या रस्त्यावर असून, तो रस्ता आता चौपदरीकरणाच्या यादीत आला आहे. रोज १० हजार वाहनांची वर्दळ असलेला

Aurangabad-Ajantha road to be completed four-quarters | औरंगाबाद-अजिंठा रस्ता होणार चौपदरी

औरंगाबाद-अजिंठा रस्ता होणार चौपदरी


विकास राऊत , औरंगाबाद
जगप्रसिद्ध अजिंठा लेण्या औरंगाबाद ते फर्दापूर या रस्त्यावर असून, तो रस्ता आता चौपदरीकरणाच्या यादीत आला आहे. रोज १० हजार वाहनांची वर्दळ असलेला हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या श्रेणीमध्ये मोडणार असून, पुढच्या वर्षी रस्त्याच्या पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. मंगळवारी त्या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, मुख्य अभियंता प्रवीण किडे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. बोडखे आदींनी पाहणी केली.
हर्सूल टी पॉइंट ते अजिंठा ते फर्दापूरमार्गे पहूर ते मुक्ताईनगर, असा या रस्त्याचा मार्ग आहे. अजिंठा लेण्यांमुळे या रस्त्याचे भाग्य फळफळणार आहे. बांधकाम विभागाच्या पाहणीनुसार या रस्त्यावर रोज १० हजारांहून अधिक वाहनांची वर्दळ आहे. त्यामुळे तो रस्ता राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाच्या निकषात बसतो. त्यामुळे दोन टप्प्यांत त्या रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. सचिव कुलकर्णी यांनी केलेल्या पाहणीमध्ये रस्त्याचे मूळ रुंदीकरण, भूसंपादनाची गरज, अतिक्रमणे, अजिंठा घाटातील धोकादायक वळणांची पाहणी करण्यात आली. केंद्र शासनाकडून या रस्त्यासाठी निधी मिळणार असून, राज्य शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या देखरेखीखाली हा रस्ता होणार आहे. या रस्त्याच्या भूसंपादनाला १८० कोटी रुपये, तर २०० कोटी रुपये बांधणीसाठी लागण्याचा अंदाज असून, २४ महिन्यांत पहिला टप्पा पूर्ण होण्याची शक्यता आहे. इंडियन रोड काँग्रेसचे पूर्ण नियम पाळून या रस्त्याचे काम होणार असल्यामुळे पाहणी करून आराखडा तयार करावा लागणार आहे. त्या अनुषंगाने बांधकाम विभागाच्या पूर्ण यंत्रणेने रस्त्याची पाहणी केली. औरंगाबाद ते अजिंठा लेणीपर्यंत पहिला टप्पा आणि तेथून पुढे दुसरा टप्पा असेल. ९५ कि़ मी. पर्यंतचे हे अंतर असून, विदेशी पर्यटकांसाठी हा रस्ता ‘वर्ल्ड क्लास’ रस्त्यांच्या यादीत यावा, असा प्रयत्न राहील, असे कुलकर्णी यांनी सांगितले.
अजिंठा लेण्यांचे सौंदर्य पाहण्यासाठी सर्वाधिक विदेशी पर्यटक येतात. त्यांना चांगल्या दर्जाचे रस्ते व आदरातिथ्य, सेवा मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अलीकडच्या काळामध्ये औरंगाबाद ते अजिंठा लेणी हा रस्ता अतिशय खराब झाला असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या रस्त्यामुळे महाराष्ट्र पीडब्ल्यूडी विभागाची पत गेली आहे.
हर्सूल गावातील भूसंपादन प्रक्रिया मागील अनेक वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे सावंगीकडून आलेल्या रस्त्याला जोडून महामार्ग पुढे नेण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. भूसंपादनाचा मोठा अडथळा दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे. हर्सूल गावातील रस्ता संपादनासाठी मनपा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने मध्यंतरी प्रयत्न केले होते.
सध्या २४ मीटर रस्ता रुंद असून सिल्लोड, फुलंब्री, अजिंठा परिसरात तो अतिक्रमित झालेला आहे. ७०० हून अधिक अतिक्रमणे त्या रस्त्यावर आहेत. त्या अतिक्रमणांची नव्याने पाहणी करण्याचे आदेश सा. बां. उपविभागीय उपअभियंता पातळीवर देण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या निकषात रस्ता होणार असल्यामुळे तो ४८ मीटर रुंद असेल. सध्या १० हजार वाहनांची वर्दळ असल्याचा पाहणी अहवाल बांधकाम विभागाकडे आहे. चौपदरीकरणानंतर वर्दळ वाढेल. डीपीआरनंतर रस्ता काँक्रिटीकरणातून करायचा की डांबरी, याचा निर्णय होईल.
राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर तो रस्ता होणार आहे. त्यामुळे त्यावर टोलचे धोरण कसे असेल, टोलमधून कार व इतर वाहनांना सवलत मिळेल काय, याबाबत अद्याप कुठलेही धोरण ठरलेले नाही. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याबाबत विचार होईल, असे सूत्रांनी सांगितले. सध्या रस्ता खराब असल्यामुळे ३० कोटींतून दोन ते तीन इंचांपर्यंत डांबरी सरफेसिंग करण्याचा विचार झाला आहे.

Web Title: Aurangabad-Ajantha road to be completed four-quarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.