आॅगस्ट हिटने नांदेडकर त्रस्त
By Admin | Updated: August 18, 2014 00:33 IST2014-08-18T00:06:49+5:302014-08-18T00:33:59+5:30
नांदेड : पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे चिंतेत असलेल्या नागरिकांना सध्या आॅगस्टमध्येच हीटचा अनुभव येत आहे़

आॅगस्ट हिटने नांदेडकर त्रस्त
नांदेड : पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे चिंतेत असलेल्या नागरिकांना सध्या आॅगस्टमध्येच हीटचा अनुभव येत आहे़ वास्तवीक आॅक्टोबर महिन्यातील हीट दोन महिन्यापूर्वीच जाणवत असल्याने नांदेडकर मात्र त्रस्त झाले आहेत़
यंदाच्या पावसाळ्यात अडीच महिन्याच्या कालावधीत केवळ २० टक्के पाऊस झाला आहे़ त्यामुळे अनेक भागातील पेरण्या खोळंबल्या आहेत़ आता या पेरण्या होणार नाहीत़ परिणामी हजारो हेक्टर शेती पडीक ठेवावी लागणार आहे़ तर दुसरीकडे अल्प पावसावर पेरण्या केलेल्या शेतकरी पिकांच्या वाढीसाठी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत़ सोयाबीन, मूग, कापसाची पिके पाण्याअभावी करपून जात आहेत़ दिवसा कडक उन्हाचे चटके तर रात्री शुभ्र आकाशात लुकलकणाऱ्या चांदण्या पाहून शेतकरी हतबल झाला आहे़ ग्रामीण भागात हे चित्र तर शहरात पिण्याच्या पाण्याचे संकट भेडसावत आहे़
मागील पंधरा दिवसापासून तापमानात वाढ झाली आहे़ सकाळपासून उन्हाचे चटके बसत आहेत़ रात्री उशिरापर्यंत उकाडा जाणवत आहे़ त्यामुळे नागरिक घामाघुम होत आहेत़
पावसाळा लागताच काढून टाकलेले कुलर अनेकांनी पुन्हा लावले आहेत़ विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर या त्रासात अधिकच भर पडत आहे़ (प्रतिनिधी)