क्षीरसागरांच्या आगामी भूमिकेकडे लक्ष
By Admin | Updated: March 21, 2017 23:55 IST2017-03-21T23:43:19+5:302017-03-21T23:55:30+5:30
बीड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील राज्याच्या टॉप फाईव्हमधील नेते म्हणून आ. जयदत्त क्षीरसागरांची ओळख आहे

क्षीरसागरांच्या आगामी भूमिकेकडे लक्ष
व्यंकटेश वैष्णव बीड
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील राज्याच्या टॉप फाईव्हमधील नेते म्हणून आ. जयदत्त क्षीरसागरांची ओळख आहे. मात्र, मागील तीन महिन्यांत जिल्ह्याच्या राजकारणात झालेल्या घडामोडींवरून क्षीरसागरांची त्यांच्याच पक्षात गोची होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. आता तर जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवड प्रक्रियेमध्ये धस यांच्या खेळीला क्षीरसागरांनी बळ दिले असल्याचा आरोप होऊ लागला आहे. एकंदरीत या हालचालीनंतर आ. जयदत्त क्षीरसागरांची आगामी राजकीय वाटचाल काय असेल याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू म्हणून जयदत्त क्षीरसागरांची एक वेगळी ओळख सबंध राज्यात आहे. मात्र, अजित पवार यांच्या धोरणात जयदत्त क्षीरसागर बसत नसल्याचे यापूर्वीही लक्षात आले आहे. बीड पंचायत समितीमध्ये जयदत्त क्षीरसागरांनी काकू-नाना आघाडीला डावलण्यासाठी शिवसंग्रामशी हात मिळवणी केली. संदीप क्षीरसागर यांच्या ताब्यात बीड पंचायत समितीची सूत्रे गेली तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला त्रास सहन करावा लागेल, या उद्देशाने त्यांनी आ. विनायक मेटे यांच्या पक्षाला बीड पंचायत समितीत बळ दिले. यानंतर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेच्या अगदी जवळ जाऊन पोहचली होती. मात्र, माजी मंत्री सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचेच ५ जि. प. सदस्य फोडले अन् राकाँला सत्ता मिळवण्यापासून रोखले. ही खेळी सुरेश धस यांनी केली मात्र या खेळीमागे जिल्ह्यातील इतरही राकाँचे नेते सहभागी आहेत असा आरोप मंगळवारी राकाँचे माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी केला. या खेळीला जेवढे माजी मंत्री सुरेश धस जबाबदार आहेत तेवढेच आ. जयदत्त क्षीरसागर, डॉ. भारतभूषण क्षीरसागर, अक्षय मुंदडा हे देखील जबाबदार आहेत. यातच डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी पक्षाच्या दुटप्पी धोरणामुळे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या सर्व घडामोडींवरून राष्ट्रवादीत आ. क्षीरसागरांची कोंडी झाली असल्याचे समोर येत आहे. यानंतर आ. क्षीरसागरांची पुढील भूमिका काय असेल हे पाहणे उत्कंठावर्धक ठरत आहे.