सर्वांचेच लक्ष मुंबईकडे लागून

By Admin | Updated: September 18, 2014 00:41 IST2014-09-18T00:25:23+5:302014-09-18T00:41:49+5:30

औरंगाबाद : जागावाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच शिवसेना आणि भाजपात सुरू झालेल्या खेचाखेचीमुळे या चारही पक्षांचे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

The attention of everyone is on the way to Mumbai | सर्वांचेच लक्ष मुंबईकडे लागून

सर्वांचेच लक्ष मुंबईकडे लागून

औरंगाबाद : विधानसभेच्या निवडणुकीसाठी जागावाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच शिवसेना आणि भाजपात सुरू झालेल्या खेचाखेचीमुळे या चारही पक्षांचे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात आहेत. आघाडी आणि युती होणार की नाही, याकडे आता कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
दोन्ही काँग्रेसमध्ये जागावाटपावरून गेल्या काही दिवसांपासून दावे- प्रतिदावे सुरू आहेत. हीच परिस्थिती शिवसेना आणि भाजपामध्ये आहे. दोन दिवसांपासून तर शिवसेना आणि भाजपाच्या संबंधात खूपच तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी, तसेच शिवसेना भाजपासह इतर पक्षांची महायुती होणार हे लोकसभा निवडणूक निकालानंतर कार्यकर्त्यांना अपेक्षित होते. मात्र, आता निवडणुका जाहीर होऊन सहा दिवस झाले तरी अद्यापही जागावाटपावरून संघर्ष असल्याने आणि तो अधिकाधिक तीव्र होत असल्याने स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम आहे. शिवसेना आणि भाजपासह महायुतीची घोषणा उद्या सायंकाळपर्यंत होणे अपेक्षित आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचा निर्णय दिल्लीतील काँग्रेस नेत्यांच्या निर्णयावर अवलंबून असल्याने हा निर्णय होण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे तयारी नसलेल्या इच्छुक उमेदवारांमध्येही चलबिचल आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेनेपेक्षा भाजपाला अधिक जागा मिळाल्यामुळे शिवसेनेबरोबर सातत्याने औरंगाबाद महापालिकेत फरफटत जाणाऱ्या भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना मात्र, आता कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेच्या बरोबरीनेच विधानसभेसाठी जागा मिळायला हव्यात असे वाटते. तर दुसरीकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मात्र, भाजपा खूपच डोक्यावर चढत असल्याची भावना असून, त्यांना ११७ पेक्षा जास्त जागा देता कामा नये, असे वाटते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जागावाटपाचा तिढा काहीही करून सुटावा व आघाडी व्हावी, असे वाटत आहे.
शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख नंदकुमार घोडेले यांनी यासंदर्भात सांगितले की, जागावाटपावरून काही वाद निर्माण झाल्याचे चित्र दिसत असले तरी शिवसेना आणि भाजपासह महायुती होईल हे निश्चित. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अभिजित देशमुख म्हणाले की, महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगे्रसची आघाडी व्हायला पाहिजे आणि आघाडी होईल, असा विश्वास आहे. लवकरात लवकर आघाडी व्हावी, असे वाटते.

Web Title: The attention of everyone is on the way to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.