१२९ ग्रा.प़ंच्या निवडणुकांकडे लक्ष
By Admin | Updated: July 6, 2017 23:51 IST2017-07-06T23:26:06+5:302017-07-06T23:51:41+5:30
मानवत : नगराध्यक्षानंतर ग्रामपंचायतीचे सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

१२९ ग्रा.प़ंच्या निवडणुकांकडे लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत : नगराध्यक्षानंतर ग्रामपंचायतीचे सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतीचे सरपंच जनतेतून निवडले जाणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभागरचना आणि प्रभागातील आरक्षणाचे काम निवडणूक विभागाने हाती घेतले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या ग्रामपंचायतींना केंद्र आणि राज्य शासनाकडून मागील काही वर्षात मोठे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. चौदाव्या वित्त आयोगाचा निधी लोकसंख्येच्या आधारावर थेट ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामपंचायतीला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे.
राज्यातील नगरपालिकेचे नगराध्यक्ष हे थेट जनतेतून निवडले गेल्यानंतर ग्रामपंचायतीचे सरपंच पदही थेट जनतेतून निवडले जाणार, अशी चर्चा काही महिन्यांपासून सुरू होती, तशी मागणीही काही वर्षांपासून होत होती. नुकताच राज्य शासनाने सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला. परभणी जिल्ह्यामध्ये ११८ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ हा आॅक्टोबर ते डिसेंबर २०१७ या कालावधीत संपणार आहे. तर ११ ग्रामपंचायतीमधील सदस्य अनर्ह ठरल्यामुळे एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालावर उच्च न्यायालयाची स्थगिती आहे. त्यामुळे ही संख्या १२९ झाली आहे.
जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतीमध्ये पहिल्यांदाच हा निर्णय राबविला जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागामध्ये राजकीय चर्चेला उधाण आले आहे. जनतेशी नाळ कायम असेल तरच सरपंचपद सोपे जाणार आहे. चांगले काम करणाऱ्यांना एक चांगली संधी यातून मिळणार असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील जिंंतूर तालुक्यातील ३४, पाथरी ७, परभणी २९, सेलू १२, गंगाखेड १३, सोनपेठ ३, मानवत ८, पूर्णा १४, पालम तालुक्यातील ९ या ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे.
गंगाखेड तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीमधील सर्वच सदस्य कलम १४ ब खाली अनर्ह ठरल्यामुळे एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालावर उच्च न्यायालयाची स्थगिती आहे.