‘महापुरुषांना गिळंकृत करण्याचा संघाचा प्रयत्न’
By Admin | Updated: January 15, 2016 00:13 IST2016-01-14T23:52:41+5:302016-01-15T00:13:58+5:30
औरंगाबाद : ‘छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांना आरएसएस अजगरासारखे गिळंकृत करण्याचा प्रयत्न करीत आहे.

‘महापुरुषांना गिळंकृत करण्याचा संघाचा प्रयत्न’
औरंगाबाद : ‘छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांना आरएसएस अजगरासारखे गिळंकृत करण्याचा प्रयत्न करीत आहे. सामाजिक क्रांती ‘डायल्यूट’ करण्याचे डावपेच सुरू आहेत व देशात धार्मिक आधारावर असहिष्णुतेचे वातावरण निर्माण करीत आहेत’ अशी घणाघाती टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले.
नामविस्तार दिनानिमित्त ते औरंगाबादेत आले असता सुभेदारी गेस्ट हाऊसवर पत्रपरिषदेत बोलत होते. त्यांनी सांगितले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५ वी जयंती वर्ष समरसता वर्ष म्हणून साजरी करण्याचे सरकारतर्फे घाटत होते.
आम्ही ते बदलून ‘सामाजिक समता वर्ष’ साजरे करण्यास बाध्य केले. ६ डिसेंबरपासून ‘एक पेन-एक वही’असे अभियान पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे हाती घेण्यात आले आहे. ‘एक पेन- एक वही’ दिल्यास त्यातून गोरगरीब मुलांचे शिक्षण तरी पूर्ण करता येईल, असा संदेश आम्ही देत आहोत. औरंगाबादेतही या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी यावेळी दिली.
शेषराव सातपुते, अशोक जाधव, कपिल इंगळे, आशा वाव्हळ, प्रकाश जाधव आदींची पत्रपरिषदेस उपस्थिती होती.