खंडणीखोर शिक्षक अटकेत
By Admin | Updated: October 19, 2016 01:07 IST2016-10-19T00:51:09+5:302016-10-19T01:07:29+5:30
औरंगाबाद : विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन कोचिंग क्लासमधील शिक्षकाकडून दहा हजारांची खंडणी वसूल करणाऱ्या सिल्लोड तालुक्यातील शिक्षकास

खंडणीखोर शिक्षक अटकेत
औरंगाबाद : विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन कोचिंग क्लासमधील शिक्षकाकडून दहा हजारांची खंडणी वसूल करणाऱ्या सिल्लोड तालुक्यातील शिक्षकास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. रामेश्वर काशीनाथ जाधव (४८, रा. मयूर पार्क),असे आरोपीचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले की, लक्ष्मी कॉलनी येथील रहिवासी असलेले मोहन वानखेडे हे एका कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी मोहन यांनी क्लासमधील एका मुलीशी हस्तांदोलन केले होते. मुलीने ही गोष्ट आपल्या पालकांना सांगितली; परंतु तक्रार मात्र केली नव्हती. मुलीच्या वडिलांनी या प्रकाराची माहिती आपला मित्र रामेश्वरला दिली होती.
या प्रकारानंतर जाधव याने मोहन वानखेडे यांची प्रत्यक्ष भेट घेतली. ‘तुमच्याविरुद्ध पोलिसांत विनयभंगाची तक्रार दाखल करतो,’ असे सांगून त्याने दोन लाखांच्या खंडणीची मागणी केली. खंडणीसाठी त्याने ६ ते १७ आॅक्टोबर या कालावधीत वानखेडे यांना अनेकदा कॉल केले. दोन लाखांपैकी दहा हजार रुपये आताच हवेत, असा फोन जाधवने सोमवारी केला. सततच्या त्रासाला कंटाळून वानखेडे यांनी सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्याकडे कैफियत मांडली. बाहेती यांनी खंडणीखोर शिक्षकावर कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेस
दिले.
गुन्हे शाखेच्या पथकाने जाधवला पकडण्यासाठी हर्सूल टी पॉइंटवर सापळा रचला; परंतु पकडण्याच्या भीतीने जाधवने तीन वेळा ठिकाण बदलले. अखेरीस आॅडिटर सोसायटीत वानखेडे यांना पैसे घेऊन बोलावले. तेथे दहा हजारांची खंडणी घेताना पोलिसांनी जाधवला अटक केली.