मांडूळ सापाची तस्करी करणारी टोळी अटकेत
By Admin | Updated: July 23, 2016 01:12 IST2016-07-23T00:28:03+5:302016-07-23T01:12:27+5:30
औरंगाबाद : दुतोंड्या साप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या चार जणांची टोळी नाकाबंदीदरम्यान हर्सूल पोलिसांच्या हाती लागली.

मांडूळ सापाची तस्करी करणारी टोळी अटकेत
औरंगाबाद : दुतोंड्या साप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या चार जणांची टोळी नाकाबंदीदरम्यान हर्सूल पोलिसांच्या हाती लागली. या टोळीकडून एक मांडूळ आणि कार हस्तगत करण्यात आली आहे. गुप्तधनाचा शोध घेण्याचे काम करणाऱ्या मांत्रिकांकडून अशा प्रकारच्या मांडूळ सापाची मागणी असते.
श्रीरंग सानप (एस.टी. चालक, मुंबई आगार, मूळ रा. पाटोदा,बीड), दलाल शेख हारून (रा.जालना), कारमालक भिका पवार(रा.भारंबा तांडा, ता.कन्नड) आणि कारचालक संतोष राठोड(रा.उंबरखेड, ता. कन्नड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुरुवारी रात्री शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी लावण्यात आली होती. शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात होती. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास हर्सूल पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसीम हाशमी आणि त्यांचे सहकारी हर्सूल पोलीस चौकीसमोर वाहनांची तपासणी करीत होते. यावेळी हर्सूलकडून शहरात जाणारी तवेरा पोलिसांनी अडवली.
यावेळी संतोष राठोड कार चालवीत होता तर भिका बाजूच्या सीटवर बसला होता. यावेळी पोलिसांनी कारमध्ये काय आहे आणि कोठे जात आहात, असा सवाल चालकास केला. त्यावेळी त्याने ‘मालकास विचारा’ असे उत्तर दिले. तेव्हा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी आपला मोर्चा पवारकडे वळवला तेव्हा त्याने जालना येथे जात असल्याचे सांगितले. शिवाय कारमध्ये काहीही नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्या कारमध्ये एक पिशवी दिसली.
या पिशवीत काय आहे, असा सवाल पोलिसांनी करताच ‘साहेब, काय दंड घ्यायचा तो घ्या आणि जाऊ द्या’ असे तो म्हणू लागला. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. पोलिसांनी त्यास पिशवी उघडायला लावली असता त्यात सुमारे चार फूट लांबीचा मांडूळ साप आढळला.
त्यानंतर दोन्ही आरोपींना सापासह ताब्यात घेऊन ठाण्यात आणून चौकशी केली. त्यावेळी त्यांनी त्यांचे दोन साथीदार सिडको बसस्थानक येथे थांबलेले आहेत. त्यांना हा साप देण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस त्यांना घेऊन सिडको स्थानक येथे गेले असता दलाल शेख हारून आणि बसचालक सानप यांना पकडले. यावेळी हारून याने जालना येथे काही जणांना हा साप विक्री करण्यासाठी नेत असल्याची कबुली दिली.