बसला थांबा न देण्याचा प्रयत्न आला अंगलट
By Admin | Updated: August 24, 2014 23:53 IST2014-08-24T23:23:00+5:302014-08-24T23:53:07+5:30
पाथरी: मानव विकासच्या बसला थांबा असतानाही बस न थांबविल्याने रणरागिनी बनलेल्या विद्यार्थिनींनी परतीच्या प्रवासात ही बस थांबवून परत गावापर्यंत नेण्यास भाग पाडले.

बसला थांबा न देण्याचा प्रयत्न आला अंगलट
पाथरी: मानव विकासच्या बसला थांबा असतानाही बस न थांबविल्याने रणरागिनी बनलेल्या विद्यार्थिनींनी परतीच्या प्रवासात ही बस थांबवून परत गावापर्यंत नेण्यास भाग पाडले. त्यामुळे बस न थांबविण्याचा प्रकार चालकाच्या चांगलाच अंगलट आला.
पाथरी तालुक्यातील लोणी बु. येथील २५ ते ३० विद्यार्थिनी गुंज येथे शिक्षणासाठी जातात. पाथरी आगाराची मानव विकासची बस दररोज सकाळी ९.३० वाजता पाथरीहून टाकळगव्हाण तांडा, बाभूळगाव, लोणी, गुंज मार्गे जाते. या बससाठी विद्यार्थिनी बसस्थानकावर वाट पाहत बसतात. मानव विकासची बस असल्याने विद्यार्थिनींना घेऊन जाण्यासाठी बस हमखास थांबतेही. परंतु, दोन दिवसापूर्वी लोणी येथे सकाळी १० वाजता ही बस आली. स्थानकावर विद्यार्थिनीनी असतानाही चालकाने बस न थांबविता गुंजला नेली. यावेळी काही विद्यार्थिनींनी बसचा पाठलागही केला. परंतु, बस थांबलीच नाही. गुंजहून बस परत येईपर्यंत या विद्यार्थिनींनी बसची वाट पाहत जागेवरच थांबल्या. बस ११ वाजता गुंजहून लोणी येथे आली. यावेळी विद्यार्थिंनींनी बस अडविली. चालकाला बस का थांबविली नाही, याचा जाब विद्यार्थिनींना विचारला. रणरागिणी बनलेल्या विद्यार्थिनींनी चालकाला पुन्हा लोणीहून गुंजला बस नेण्यास भाग पाडले. या प्रकारामुळे बसमधील चालक आणि वाहक मात्र चांगलेच गांगारुन गेले. लोणी येथील आश्विनी गिराम, रोहिणी धर्मे, वैशाली गिराम, भाग्यश्री धर्मे, प्रियंका चाममेरु, अर्चना धर्मे, प्रियंका गिराम, भारती धर्मे आणि मनिषा गिराम या विद्यार्थिंनींच्या धाडसाचे गावकऱ्यांनी कौतुक केले आहे. (प्रतिनिधी)