धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: May 21, 2014 00:19 IST2014-05-21T00:09:57+5:302014-05-21T00:19:12+5:30
जालना : लोकसभा निवडणुकीत मोठी दाणादाण उडालेल्या सत्तारूढ काँग्रेस आघाडीच्या लोकप्रतिनिधींनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता स्वत:सह कार्यकर्त्यांना सावरण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न
जालना : लोकसभा निवडणुकीत मोठी दाणादाण उडालेल्या सत्तारूढ काँग्रेस आघाडीच्या लोकप्रतिनिधींनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता स्वत:सह कार्यकर्त्यांना सावरण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. लोकसभेच्या निवडणुका म्हणजे विधानसभेची तालीम, असे समजूनच या जिल्ह्यातील सत्तारूढ व विरोधी पक्षांच्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी तसेच इच्छुकांनी प्रचारयुद्धात स्वत:स झोकून दिले होते. विशेषत: उमेदवाराच्या बरोबरीने या लोकप्रतिनिधींनी मतदारांपर्यंत पोहोचण्याची संधी साधण्याचा अटोकाट प्रयत्न केला. जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे व आ. सुरेश जेथलिया या दोघांनी परभणी लोकसभा मतदारसंघात घनसावंगी व परतूर या दोन विधानसभा कार्यक्षेत्रात स्वत:सह कार्यकर्त्यांना प्रचारयुद्धा जुंपून घेतले होते. या दोघा पुढार्यांनी आठ-पंधरा दिवसात गावोगाव भेटी दिल्या. पक्षश्रेष्ठींच्या सभा यशस्वी केल्या. आप-आपल्या कार्यक्षेत्रातून आघाडीस मताधिक्य मिळावे म्हणून, भावनिक साद घातली. आ. संतोष सांबरे यांनी बदनापुरातून, आ. कैलास गोरंट्याल यांनी जालन्यात, आ. चंद्रकांत दानवे यांनी भोकरदनमधून असेच प्रयत्न केले. माजी आ. शिवाजीराव चोथे, उपनेते लक्ष्मणराव वडले यांनी घनसावंगीतून, माजी मंत्री अर्जुन खोतकर माजी आ. बबनराव लोणीकर यांनी घनसावंगी, परतूरसह जालन्यातून, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी जालन्यातून प्रचारयुद्धात झोकून दिले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक पुढारी निवडणूक लढविण्यास उत्सुक होते. तर काही आप-आपल्या कार्यक्षेत्रात या माध्यमातून विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून मोर्चेबांधणी करणार होते. परंतु, या निवडणुकीत या पक्षाने अखेर तटस्थ भूमिका स्वीकारली. परिणामी सर्व इच्छुकांना या धामधुमीत अक्षरश: मौनी भूमिका स्वीकारावी लागली. या पार्श्वभूमीवर १६ मे रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. अन् सत्तारूढ काँग्रेस आघाडीच्या विद्यमान लोकप्रतिनिधींसह अनेक पुढार्यांच्या अक्षरश: तोंडचे पाणी पळाले. महायुतीला मतदारांनी दोन लाखांवर मताधिक्य देऊन आघाडीस मोठा हिसका दाखविल्याने, हे पुढारी अक्षरश: हादरून गेले. त्या धक्क्यातून हे पुढारी अद्यापही बाहेर आले नाहीत. गोंधळून गेलेल्या या पुढार्यांनी गेल्या दोन दिवसांपासून आता स्वत: सावरत कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना सावरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आ. कैलास गोरंट्याल यांनी दोन दिवसापूर्वी सर्व नगरसेवक, पदाधिकारी व विश्वासू कार्यकर्त्यांची खास बैठक बोलावली. त्यातून जालना विधानसभेअंतर्गत सर्कलनिहाय मतदानासह मताधिक्याचा आढावा घेतला. शहरांतर्गत स्थितीही पडताळली. आता सावरले पाहिजे, असा संकल्प करीत, स्वत:सह गोरंट्याल यांच्यासह कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार केला. पालकमंत्री टोपे हे गेल्या दोन दिवसांपासून घनसावंगी मतदारसंघातच तळ ठोकून आहेत. त्यांच्या प्रभावक्षेत्रास महायुतीने सुरूंग लावल्यानंतर टोपे हे चांगलेच गडबडले आहेत. त्यातून ते स्वत:सह कार्यकर्त्यांना सावरण्याचा ते प्रयत्न करू लागले आहेत. आ. चंद्रकांत दानवे यांनी या निवडणुकीत त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी खा. रावसाहेब दानवे यांना आसमान दाखविण्याच्या गप्पा मारल्या. प्रत्यक्षात त्या फोल ठरल्या. आता आगामी निवडणुका जड जाणार, हे ओळखून दानवेंनीही चिंतन सुरू केले आहे. आ. संतोष सांबरे यांनी खा. दानवेंना भक्कम साथ दिली. सर्वाधिक मताधिक्य दिले. त्यामुळे ते कमालीचे उत्साहात असून, विजयाच्या पार्श्वभूमीवरही निवडणुका सोप्या असणार नाहीत, हे ओळखून तेही कामाला लागले आहेत. माजीमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख अंबेकर, समाजवादी पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष माजी आ. विलासराव खरात आदी नेतेमंडळीही आता नव्या जोमाने कामास लागतील, अशी चिन्हे आहेत. (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुका चार महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्याचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. त्यामुळेच लोकसभा निकालांच्या धक्क्यातून सावरलेल्या लोकप्रतिनिधींसह अन्य इच्छुकांनी या निकालांचे आप-आपल्या पद्धतीने विश्लेषण तर काहींनी परखडपणे आत्मपरीक्षण करीत स्वत:स सावरण्याचा व कार्यपद्धतीत बदल करण्याचा निर्धार केला आहे. त्या अनषंगाने प्रमुख राजकीय पक्षांचे नेते मंडळी कामालाही लागले आहेत.