व्याजाने पैसे देऊन जमीन हडपण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: December 9, 2015 23:49 IST2015-12-09T23:36:50+5:302015-12-09T23:49:43+5:30
भोकरदन : तालुक्यातील दानापूर व वाकडी येथे शेतकऱ्यांना व्याजाने पैसे देऊन त्यांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन सावकारांविरुद्ध भोकरदन पोलिसात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

व्याजाने पैसे देऊन जमीन हडपण्याचा प्रयत्न
भोकरदन : तालुक्यातील दानापूर व वाकडी येथे शेतकऱ्यांना व्याजाने पैसे देऊन त्यांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन सावकारांविरुद्ध भोकरदन पोलिसात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे यात एका महिला सावकाराचा समावेश आहे़
दानापूर येथील बाबूराव भूजंगराव जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, गट कं्रमाक २६ मधील ३ एकर शेतजमीन २००५ मध्ये पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी मथुुराबाई तोताराम काकडे (५५) यांच्याकडून १ लाख रूपये २ रूपये शेकडा व्याजाने घेतले होते. त्यानंतर ३ एकर शेतजमीन आरोपीच्या नावावर करून दिली. २००७ मध्ये १ लाख ४० हजार रूपये व्याजासह परत केले, मात्र ६ हजार रूपये बाकी होते. शंभर रूपयांच्या बॉन्डवर ६ हजार रूपये परत केल्यावर जमीन शेतकऱ्यांच्या नावावर परत करून देण्यात येईल, असा लेखी करारनामा केला होता. मात्र, त्यानंतरही जमीन परत देण्यात आली नाही. त्यानंतर बाबूराव जाधव यांनी तक्रार दिल्यामुळे आरोपी महिला सावकार मथुराबाई काकडे यांच्या विरूध्द ४२०, ४८, महाराष्ट्र सावकारी कायदा अधिनियमाखाली गुन्हा दाखल झाला.
वाकडी येथील जगन्नाथ बाबूराव सिरसाठ यांनी तक्रारीत म्हटले आहे की, सावकार राजू मुरलीधर सिरसाठ यांच्याकडे २००७ मध्ये १०२ आर शेती गहाण ठेऊन १ लाख रूपये ३ टक्के व्याजाने तसेच त्यानंतर ३८ हजार रूपये ५ रूपये प्रतिशेकडा व्याजाने घेतले. त्यानंतर १ लाख ५० हजार रूपये व्याजासह परत केल्यानंतर जमीन परत नावावर करून देण्याची मागणी केली तेव्हा आरोपीने जमीन परत देण्यास नकार दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
औरंगाबाद विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे व प्रभारी पोलिस अधिक्षक राहुल माकणीकर भोकरदन येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व पोलिस ठाण्याच्या तपासणीसाठी शहरात आले होते. तेव्हा सावकाराविरूद्ध तक्रारीचे किती अर्ज प्रलंबित आहेत, याची माहिती त्यांनी घेतली. त्यामध्ये या अर्जाचा समावेश होता. याबाबत त्यांनी तात्काळ सावकाराविरूध्द गुन्हे दाखक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषगाने हे गुन्हे दाखल झाले आहेत़
कर्जमाफीचा लाभ नाहीच
४सरकारने खाजगी सावकाराचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. त्याचा इतर ठिकाणी शेतकऱ्यांना लाभ सुध्दा झाला. तालुक्यात सहा सावकारांनी परवाना काढलेला आहे. मात्र, त्याच्यांकडून एकाही शेतकऱ्याने कर्ज घेतल्याची नोंद सहाय्यक निंबधक कार्यालयात नाही.