वन्य प्राण्यांचा पिकांवर हल्ला
By Admin | Updated: September 24, 2014 01:04 IST2014-09-23T23:30:51+5:302014-09-24T01:04:00+5:30
घाटनांद्रा : येथील गोरखनाथ व हरणबरडी शिवारातील शेतातील पिकांवर वन्य प्राण्यांनी हल्ला करून पिकांचे प्रचंड नुकसान केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

वन्य प्राण्यांचा पिकांवर हल्ला
घाटनांद्रा : येथील गोरखनाथ व हरणबरडी शिवारातील शेतातील पिकांवर वन्य प्राण्यांनी हल्ला करून पिकांचे प्रचंड नुकसान केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
उशिरा का होईना या शिवारात बऱ्याप्रमाणात पाऊस झालेला असताना सोयाबीन, कपाशी ही पिके बहरात आली आहेत. निसर्गाने तारले असले, तरी वन्यप्राणी मारीत असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. या भागातील डोंगराजवळ असलेल्या गोरखनाथ, हरणबरडी या शेतातील शेकडो एकर जमिनीतील पिकांवर रात्री निलगाय, हरिण, रानडुकरे व इतर वन्य प्राणी नुकसान करीत आहेत. ते पिकात घुसून उभी पिके आडवी करीत असल्याची तक्रार पोपट मोरे, रमजान शेख, अलीम तडवी, शेख जिलानी, जाकेर देशमुख यांनी केली. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी वनविभागाकडे केली आहे.
कोरडवाहू पिकांनी माना टाकल्या
बाजारसावंगी : परिसरातील कोरडवाहू जमीन क्षेत्रातील कापूस, मका, तूर, बाजरी, भुईमूग आदी पिकांनी पाण्याअभावी माना टाकल्या असून, मका पिकांची दाणे भरण्याची वेळ असताना पंधरवड्यापासून पावसाने उघडीप दिली. परिणामी पिकांवर परिणाम होत आहे. आधीच उशिराची लागवड, त्यातही प्रत्येक वेळेसे पावसाची उघडीप, विविध रोगांचा प्रादुर्भाव अशा संकटात शेतकरीवर्ग सापडला आहे. खरीप पिकाबरोबरच रबी पिकावरही पावसाच्या उघडीपीचा परिणाम होणार असल्याने पुढल्या पिकांच्या आशेवर पाणी सोडले जात आहे. दरेगाव, बाजार सावंगी परिसरात खरिपाबरोबर रबीचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे आता पावसाची शेतकरी वाट पाहत आहेत.