प्रतिकार करणाऱ्या सुरक्षारक्षकावर हल्ला
By Admin | Updated: September 5, 2014 00:50 IST2014-09-05T00:49:24+5:302014-09-05T00:50:55+5:30
औरंगाबाद : चोरी करताना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षारक्षकावर चोरट्याने हल्ला करून पळ काढला.

प्रतिकार करणाऱ्या सुरक्षारक्षकावर हल्ला
औरंगाबाद : चोरी करताना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षारक्षकावर चोरट्याने हल्ला करून पळ काढला. चोरट्याच्या या हल्यात सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला. ही घटना रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतीतील निर्लेप कंपनीत घडली. हे कृत्य करणाऱ्या चोरट्याची सीसीटीव्हीमुळे ओळख पटली आणि काल त्याला सातारा पोलिसांनी अटक केली.
अनिल प्रभाकर गायकवाड (२५, रा. छोटामुरलीधरनगर) असे या चोरट्याचे नाव आहे. तो पोलीस रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे. या घटनेबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी सांगितले की, प्रकाश बळीराम दरवेशी हे निर्लेप कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करतात.
३० आॅगस्ट रोजी पहाटे ते ड्युटी करीत असताना आरोपी अनिल गायकवाड हा कंपनीत चोरीसाठी घुसला. त्याने साहित्य चोरण्यास सुरुवात केली. ही बाब सुरक्षारक्षक दरवेशी यांच्या नजरेस पडली. त्यांनी या चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने लोखंडी रॉडने दरवेशींवर हल्ला चढविला. या हल्यात दरवेशी जखमी झाल्यानंतर चोरट्याने तेथून धूम ठोकली.
या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात दरवेशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. दरम्यान, हा प्रकार कंपनीत लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्या फुटेजवरून हा गुन्हा कुख्यात गुन्हेगार अनिल गायकवाड याने केल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा जमादार सुधाकर पाटील, राजेंद्र साळुंके, देशराज मोरे यांनी शोध घेऊन काल आरोपी अनिलला अटक केली.
त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक प्रजापती यांनी व्यक्त केली.