मयूरपार्क परिसरातील ‘एटीएम’ फोडले
By Admin | Updated: June 14, 2014 01:20 IST2014-06-14T01:19:29+5:302014-06-14T01:20:18+5:30
औरंगाबाद : घरफोडी, लुटमारीसारख्या बेभरवशाच्या चोरीपेक्षा शहरातील बेवारस ‘एटीएम’ फोडायचे आणि मोठे घबाड पळविण्याकडे चोरट्यांचा कल वाढलेला आहे.
मयूरपार्क परिसरातील ‘एटीएम’ फोडले
औरंगाबाद : घरफोडी, लुटमारीसारख्या बेभरवशाच्या चोरीपेक्षा शहरातील बेवारस ‘एटीएम’ फोडायचे आणि मोठे घबाड पळविण्याकडे चोरट्यांचा कल वाढलेला आहे. असाच प्रकार मयूरपार्क परिसरातील मारोतीनगरमध्ये शुक्रवारी पहाटे घडला; मात्र शेजारच्या नागरिकांमुळे थोडक्यात ‘एटीएम’ची लूट टळली.
दरम्यान, एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याने चोरट्याचे सारे कारणामे टिपले आहेत. ‘एटीएम’ कक्षात त्याने कधी प्रवेश केला. आत गेल्यावर त्याने टिकासाच्या साह्याने एटीएम कसे फोडले, हे फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून सिडको ठाण्याचे निरीक्षक राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गोरख चव्हाण व कर्मचाऱ्यांनी पहाटेपासून दिवसभर मयूरपार्क व आजूबाजूच्या परिसरात कोम्बिंग आॅपरेशन राबविले.
औरंगाबाद : त्यात मागच्या दोन-तीन महिन्यांपूर्वी आंबेडकरनगर चौकातील ‘एटीएम’ फोडणाऱ्या तीन गुन्हेगारांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. असे असले तरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला एटीएम फोडणारा मुख्य चोरटा मात्र पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला.
आवाजाने एकजण जागा झाला
‘एटीएम’च्या खालच्या बाजूमध्ये पैसे असतात म्हणून चोरट्याने तेथे टिकासाचा जोरात प्रहार केला. त्या आवाजाने बाजूच्या अर्पाटमेंटमध्ये बाहेर झोपलेले देशपांडे नावाचे जागरूक नागरिक जागे झाले. त्यांनी ‘कोण आहे रे’ असे म्हणत आवाज दिला व मुलाला सोबत घेऊन ते एटीएमच्या दिशेने धावले. त्यांना पाहून चोरट्याने हातात टिकास घेऊन तेथून पळ काढला. देशपांडे यांनी तात्काळ सिडको ठाण्याला फोन करून घडलेली घटना पोलिसांना कळवली. नेमके त्यावेळी जवळच्याच वसाहतीत पोलीस गस्तीवर होते. ते अवघ्या १० मिनिटांत तेथे पोहोचले.
यापूर्वी पिसादेवी रोडवरील आंबेडकरनगरमध्ये ‘एटीएम’ फोडताना रंगेहाथ अटक केलेल्या तीन चोरट्यांना पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. लवकरच फरार चोरट्याला अटक करू, असा विश्वास उपनिरीक्षक गोरख चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
चौकट...
बेवारस ‘एटीएम’ची संख्या मोठी
शहरात राष्ट्रीयीकृत व अन्य बँकांचे मिळून १५० एटीएम आहेत. प्रत्येक एटीएमच्या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी नेमावा, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा लेखी सूचना पोलिसांनी बँकांना दिल्या आहेत; पण शहरातील अनेक ‘एटीएम’ बेवारस आहेत. आतापर्यंत ‘एटीएम’ फोडण्याच्या ५ ते ६ घटना घडल्या आहेत. त्यापैकी सिडको ठाण्याच्या हद्दीत ३ घटना घडल्या आहेत. एका ‘एटीएम’मध्ये किमान १५ लाख रुपयांच्या नोटा असतात. एटीएमच्या माध्यमातून एवढी मोठी रक्कम बँका कोणाच्या भरवशावर ठेवतात, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
कशी घडली घटना
मयूरपार्क येथील मारुतीनगरमध्ये हनुमानमंदिराजवळ भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे. साधारणपणे २१-२२ वर्षे वयोगटातील एक तरुण पहाटे ४.२२ वाजेच्या सुमारास हातात टिकास घेऊन ‘एटीएम’मध्ये गेला.
जाताना त्याने अंगातील टीशर्ट डोक्यावर घेऊन तोंड लपविण्याचा प्रयत्न केला. कदाचित त्याला आतमध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरा असेल व तो आपला फोटो टिपेल, अशी त्याला भीती वाटली असावी.
आत गेल्यानंतर ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्याकडे दुर्लक्ष करीत त्याने गडबडीत टिकासाच्या साह्याने ‘एटीएम’ फोडले.