एटीएम फोडणारी टोळी गजाआड
By Admin | Updated: October 30, 2014 00:30 IST2014-10-30T00:13:00+5:302014-10-30T00:30:08+5:30
औरंगाबाद : बँकांच्या निष्काळजीपणाचा फायदा उचलत शहरातील विविध एटीएम सेंटर फोडणाऱ्या एका टोळीला मुकुंदवाडी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली.

एटीएम फोडणारी टोळी गजाआड
औरंगाबाद : बँकांच्या निष्काळजीपणाचा फायदा उचलत शहरातील विविध एटीएम सेंटर फोडणाऱ्या एका टोळीला मुकुंदवाडी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली. त्या पाठोपाठ असेच गुन्हे करणारी आणखी एक टोळी सिडको पोलिसांच्या हाती लागली आहे. या टोळीतील दोन आरोपींना बुधवारी अटक करण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये किशोर दगडू सदाशिवे (३२) व दत्तू सुरेश जाधव (२४, रा. मिसारवाडी) यांचा समावेश आहे. या आरोपींच्या अन्य साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. या आरोपींनी दिवाळीच्या रात्री एका तरुणाचे एटीएम कार्ड काढून घेत त्या अधारे जाधववाडीतील सनी सेंटर येथील एसबीआयच्या एटीएम सेंटरमधून पैसे काढले. नंतर हे मशीन फोडून त्यातील रक्कम पळविण्याचाही प्रयत्न केला होता, असे तपासात उघडकीस आले.
या घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मिसारवाडीतील संतोष दत्तू पाचवणे या युवकाने २३ आॅक्टोबर रोजी रात्री मित्रांसोबत पार्टी केली. पार्टीत मनसोक्त मद्यप्राशन केले. दारू जास्त झाल्याने घरी न जाता संतोष मिसारवाडीतच रस्त्यावर झोपी गेला. त्याला शुद्ध आली तेव्हा पहाट झाली होती. शिवाय, नशेत असल्याची संधी साधून कुणी तरी आपल्या खिशातील अडीच हजार रुपये रोख आणि एटीएम कार्ड काढून घेतल्याचे त्याच्या लक्षात आले. त्या एटीएम कार्डचा वापर करून सनी सेंटर येथील एटीएम सेंटरमधून आपल्या खात्यावरचे दोनशे रुपये चोरट्यांनी काढल्याचा मॅसेजही त्याला मोबाईलवर मिळाला. या चोरीबाबत संतोषने सिडको पोलीस ठाण्यात माहिती कळविली.
सीसीटीव्ही फुटेजवरून सापडले आरोपी!
संतोषच्या तक्रारीवरून लगेच सिडको ठाण्याचे निरीक्षक राजकुमार डोंगरे, फौजदार गोरख चव्हाण, जमादार संपत राठोड, अरुण उगले, दीपक शिंदे, राजू घुनावत यांनी तपासाची चक्रे फिरवली. त्या एटीएम सेंटरवर जाऊन पाहणी केली. तेव्हा तेथील मशीनची तोडफोड झालेली असल्याचे अन् तेथील एक सीसीटीव्ही कॅमेराही चोरी गेलेला असल्याचे उघडकीस आले.
सुदैवाने चोरट्यांना मशीनची तिजोरी फोडता आली नव्हती, त्यामुळे पैसे सुरक्षित राहिले होते. मग पोलिसांनी मशीनमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मिळविले. त्यात संतोषच्या एटीएम कार्डच्या अधारे पैसे काढून मशीन फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिन्ही आरोपींची छायाचित्रे पोलिसांच्या हाती लागली. त्यावरून पोलिसांनी शोध घेऊन तिघांपैकी किशोर सदाशिवे व दत्तू जाधव या दोघांना आज अटक केली.
तिसरा साथीदार सापडलेला नाही, त्याचा शोध सुरू असल्याचे फौजदार गोरख चव्हाण यांनी सांगितले.
आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
या तिन्ही आरोपींविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात संतोष पाचवणेच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बँकेने अद्याप एटीएम फोडीची फिर्याद दिलेली नाही.
बँकेची फिर्याद आल्यानंतर तोही गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. या आरोपींकडून एटीएम फोडीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता फौजदार चव्हाण यांनी व्यक्त केली.